शनिवारी रात्री दीडच्या सुमारास बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर एका बसला भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर बसला लागलेल्या आगीत २५ प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला आहे. ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातानंतर राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघातस्थळी जाऊन पाहणी केली आहे.
घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, “आज सकाळपासूनच आम्ही जिल्हाधिकारी आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो. घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्याची भीषणता लक्षात येते. रात्री दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. धावती बस खांबाला धडकून डिझेलच्या टाकीचा स्फोट झाला, त्यांनतर बसला आग लागली, असं प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. रिपोर्टमध्येही तेच नमूद केलं आहे.”
“दुर्दैवाने या घटनेत २५ लोकांचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्तांना बाहेर काढण्याची संधीच मिळाली नाही. आठ लोक यातून बाहेर निघाले आणि आठजण जखमी झाले आहेत. जखमींवर तत्काळ चांगले उपचार करा, अशा सूचना आम्ही जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यांचा जीव वाचला पाहिजे आणि त्या अनुषंगाने कार्यवाही सुरू आहे. दुर्दैवाने २५ लोकांना वाचवता आलं नाही, ही मोठी दुखद घटना आहे. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही घटनास्थळी दाखल झालो. समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात लक्षात घेता, भविष्यात जे काही आवश्यक असेल, ते सर्व केलं जाईल,” अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
नेमकं काय घडलं?
प्रवासी बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथील प्रवासी होती. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस (एमएच २९ बीई १८१९) होती. बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि बसने पेट घेतला. या घटनेत २५ प्रवाशांचा मृत्यू झाला.
हेही वाचा- ’समृद्धी’ मार्गावरील अपघातांच्या प्रश्नावर गडकरी दिल्लीत काय म्हणाले होते?
ही बस ३० जूनला नागपूरहून संध्याकाळी ५ वाजता पुण्यासाठी निघाली होती. १ जुलैच्या रात्री १.२२ मिनिटांनी धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून उलटी झाली. त्यानंतर काही मिनिटांमध्ये गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवासी बस पेटली आणि ही दुर्घटना घडली.