वर्षभरापूर्वी राज्यात एक राजकीय भूकंप झाला. शिवसेनेत उभी फूट पडली आणि एकनाथ शिंदेंसह पक्षाचे अनेक आमदार सूरत-गुवाहाटी-गोवा करत भाजपासोबत गेले. ठाकरे सरकार पडलं आणि शिंदेंच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आलं. त्यावेळी शिंदे गटाकडून बाहेर पडण्याच्या सांगण्यात आलेल्या अनेक कारणांमध्ये अजित पवार अर्थमंत्री असून ते शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नाहीत, शिवसेना संपवण्याचं काम चालू आहे हे एक महत्त्वाचं कारण होतं. पण आता पुन्हा अजित पवारांकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या गेल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
२ जुलै रोजी अजित पवारांनी भर दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण ८ आमदारांना घेऊन राजभवन गाठलं. ८ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून अजित पवार गटासाठीचं खातेवाटप प्रलंबित होतं. अखेर शुक्रवारी या खातेवाटपाला मुहूर्त लागला. शिंदे गट व भाजपाकडची काही खाती अजित पवार गटाकडे गेली. त्यात सर्वाधिक चर्चा झाली ती अर्थखात्याची. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे असणारं अर्थखातं अजित पवारांकडे गेलं आणि राजकीय चर्चांना उधाण आलं.
हेच ठरलं होतं का?
अजित पवारांवरच टीका करत तेव्हाच्या सरकारमधून व शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्या शिंदे गटाची आणि महत्त्वाचं म्हणजे खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आता यावर नेमकी काय भूमिका असेल? याविषयी तर्क-वितर्क लावले जाऊ लागले. संजय शिरसाट यांनी आधीच जे ठरलंय त्यानुसार खातेवाटप होईल, असं सांगून हे ठरलंच होतं, असं सांगितलं होतं. त्यावर अजित पवारांना अर्थखातं मिळाल्यामुळे ‘हेच ठरलं होतं का?’ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या सर्व चर्चांवर शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना भूमिका मांडली.
“देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याला एकेकाळी…”, ठाकरे गटाची खोचक टीका!
“कुणालाही चिंता करायची गरज नाही”
अजित पवारांच्या अर्थखात्याविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ‘चिंता नसावी’ असा संदेश शिंदे गटाच्या आमदारांना दिला आहे. “तेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो. मी आता मुख्यमंत्री आहे. त्यामुळे सगळ्या आमदारांना समान न्याय देण्याचं काम आम्ही करू. कुणालाही चिंता करण्याची गरज नाही. देवेंद्र फडणवीसही उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी तर पाच वर्षं मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे. अजित पवारांनाही प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून सर्वांना सोबत घेऊन सर्वांना न्याय देण्याचं काम नक्की केलं जाईल”, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.