टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर महाराष्ट्र सरकारने भारतीय क्रिकेट संघाला ११ कोटी रुपये बक्षिस देण्याची घोषणा केली होती. मात्र, या निर्णयावरून विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं होतं. आधीच भारतीय संघावर कोट्यवधीची उधळण होत असताना पुन्हा ११ कोटी देण्याची गरजच काय? असा सवाल विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला होता. दरम्यान, विरोधकांच्या या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदे यांनी या आज अधिवेशनाचे समारोपीय भाषण केले. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच त्यांनी विरोधकांच्या टीकेलाही उत्तर दिलं.

हेही वाचा – Eknath Shinde : “तुमचा तुरुंगात पाठवायचा चौथा नंबर होता”, विधानसभेत एकनाथ शिंदे फडणवीसांना काय म्हणाले?

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

“आपण विश्वचषक जिंकलो, त्याच आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. या विजयानंतर मरिन ड्राईव्हवर लाखो लोक खेळाडूंच्या स्वागतासाठी आली होती. यावेळी काय होईल, अशी भीती वाटत होती. मात्र, मुंबई पोलिसांनी योग्य नियोजन केलं. एकही दुर्घटना न होऊ देता, मुंबई पोलिसांनी लाखोंची गर्दी नियंत्रणात आणली”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

विरोधकांना भारतीय संघाच्या विजयाचा आनंद नाही का?

“विजय रॅली निघाली तेव्हा मुंबईकरांचे आणि खेळाडूंचं स्पीरिट आपण बघितलं. या खेळाडूंचे अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. ते देशाचा गौरव आहेत. आम्ही विधानसभेत त्यांचा सत्कार केला. आणि त्यांना ११ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यावर विरोधकांनी टीका केली. आपल्याला आपल्या खेळाडूंचा अभिमान असायला हवा. आपला भारतीय संघ टी-२० विश्वचषक जिंकला, त्याचा विरोधकांना आनंद नाही का? आम्हाला विरोधकांकडून ही अपेक्षा नव्हती”, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा – विधान परिषद निवडणूक निकाल : पंकजा मुंडेंसह भाजपाच्या पाचही उमेदवारांचा विजय…

“कसाबच्या बिर्याणीला पाठिंबा देता, मग खेळाडूंना…”

“विजयी रॅली निघाली त्या दिवशी गुजरातची बस का आणली, अशी टीकाही विरोधकांनी केली. गुजरात काय देशाच्या बाहेर आहे का? विरोधक ११ कोटी रुपयांचे बोलत आहेत पण आमच्या अजित पवारांनी खिशा हलवला तर कुठंतरी ११ कोटी रुपये पडतील. एवढ पैसे आमच्या सरकारकडे आहे. या सगळ्या पैशांची तरतूद आम्ही केली आहे. त्यामुळे विरोधकांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही”, अशी मिश्किल उत्तरही त्यांनी दिलं. पुढे बोलताना, “विरोधक कसाबच्या बिर्याणीला पाठिंबा देतात, मात्र भारतीय संघाला ११ कोटी रुपये दिले, तर विरोधकांच्या पोटात दुखतं”, अशी टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde replied to opposition mva 11 core gift to cricket team spb
Show comments