पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ( १२ जानेवारी ) ‘घराणेशाही’वर केलेल्या वक्तव्यामुळे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. “कल्याण-डोबिंवलीतील गद्दारांच्या घराणेशाहीवर पंतप्रधान बोलले नाहीत,” असा हल्लाबोल शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “घराणेशाहीची व्याख्या उद्धव ठाकरेंनी सांगितली पाहिजे,” असं आव्हान मुख्यमंत्र्यांनी दिलं.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
“घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचं अरपिमित नुकसान झालं आहे. घराणेशाहीच्या राजकारणाचा प्रभाव कमी करण्यासाठी देशातील युवकांनी सक्रिय राजकारणात सहभागी व्हावं,” असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ( १२ डिसेंबर ) केलं होतं.
“घराणेशाहीवर एका घरंदाज माणसानं बोलेलं चांगलं”
“कल्याण-डोबिंवलीतील गद्दारांच्या घराणेशाहीवर पंतप्रधान मोदी बोलले नाहीत. ती घराणेशाही चालते का? गद्दार लोकप्रिय आणि त्यांची घराणेशाही प्राणप्रिय… हा सगळा बोगसपणा आहे. घराणेशाहीवर एका घरंदाज माणसानं बोलेलं चांगलं,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती.
“बाळासाहेबांच्या विचारांना उद्धव ठाकरेंनी तिलांजली दिली”
मुख्यमंत्री शिंदेंनी ठाण्यात कोपरी येथील श्री कौपनेश्वर महादेव मंदिरात स्वच्छता अभियान राबवलं. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी घराणेशाहीची व्याख्या सांगितली पाहिजे. ते स्वत:चं घर अबाधित ठेवू शकले नाहीत. त्यांनी घरातील सर्वांना बाहेर काढलं. ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ एवढ्यापुरतं त्यांचं काम मर्यादित आहे. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली.”
“…म्हणून उद्धव ठाकरेंची ही अवस्था झाली”
“बाळासाहेब आपल्या नेत्यांना आणि सहकाऱ्यांना सवंगडी म्हणून वागवत होते. पण, उद्धव ठाकरेंनी पक्षाला खासगी मालमत्ता म्हणून चालवलं. तर, सहकाऱ्यांना सवंगडी नाहीतर घरगडी समजतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंची ही अवस्था झाली आहे,” अशी टीकाही एकनाथ शिंदेंनी केली.