शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला ‘बोगस’ म्हणत टीका केली होती. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अडीच वर्षे घरात बसून बोगसगिरी करणाऱ्यांनी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला ‘बोगस’ म्हणणं हा जनतेचा अपमान आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“शेतकऱ्यांची अवस्था फार वाईट आहे. ‘शासन आपल्या दारी’ म्हणून चालू असलेला बोगसपणा बंद पडला आहे. कारण, कुणी दारातही उभे करण्यास तयार नाही. फाय भयानक परिस्थिती आहे. कुणी त्यांना विचारत नाही. पिकविम्याचे पैसे मिळत नाही,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
“घोषणा करून भुलभुलैया करू नका”
“सरकारचा उल्लेख दुष्काळात तेरावा महिना असा याआधीही केला आहे. शेतकऱ्यांचं कर्ज वाढत आहे. बँकांचे तगादे शेतकऱ्यांमागे लागले आहेत. विमा कंपन्यांची दारे ठोठावली तरी उघडत नाहीत. ही थोतांड नाटके बंद करून शेतकरी कर्जमाफी करावी. निवडणुका तोंडावर आहेत घोषणा करून भुलभुलैया करू नका,” असंही ठाकरेंनी सरकारला ठणकावलं होतं.
“‘शासन आपल्या दारी’ला बोगस म्हणणं म्हणजे जनतेचा अपमान”
याला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदेंनी म्हटलं, “काहीजण म्हणतात, ‘शासन आपल्या दारी’ बोगस कार्यक्रम आहे. अडीच वर्षे घरी बसणाऱ्यांना ‘शासन आपल्या दारी’चं महत्वं काय कळणार? शेतकरी, कष्टकरी आणि माता-भगिनींच्या वेदना काय कळणार? ज्यांनी अडीच वर्षे घरात बसून बोगसगिरी केली, त्यांनी ‘शासन आपल्या दारी’ला बोगस म्हणणं म्हणजे कार्यक्रमाला आलेल्या जनतेचा अपमान आहे. आपली टिंगलटवळी करणाऱ्यांना योग्यवेळी उत्तर गेल्याशिवाय राहणार नाही.”