शिंदे गटाच्या उठावाची दखल अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्याकडूनही घेण्यात आल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आहे. बुधवारी सायंकाळी नागपूरमधील पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदेंनी बिल क्लिंटन यांना आपल्या कामाबद्दल उत्सुकता असल्याचं म्हटलं आहे.
नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. सर्वपक्षीय आमदार सध्या नागपूरमध्ये आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सायंकाळी पत्रकारांशी वार्तालाप केला. यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना शिंदेंनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनाही शिंदे गटाच्या उठावाबद्दल उत्सुकता असल्याचं ते म्हणाले. एका भारतीय व्यक्तीच्या नातेवाईकाकडे क्लिंटन आपल्याबद्दल चौकशी करत होते असा दावा शिंदेंनी पत्रकार परिषदेत केला.
एकनाथ शिंदेंनी प्रश्नाला उत्तर देताना, “महिन्याभरापूर्वी माझ्याकडे एक माणूस आला होता. तो बिल क्लिंटनकडे काम करतो. तो भारतीय माणूस आहे. त्याला त्यांनी विचारलं Who is Eknath Shinde? क्या हैं वो? क्या करता हैं? काय करतो एकंदर? केवढं काम करतो? कधी झोपतो? कधी जेवतो?” असे प्रश्न विचारल्याचं सांगितलं.
“पत्रकार विचारतात काय झालं? कसं झालं सांगत नाही म्हणतात. पण सगळं सांगता येत नाही,” असंही शिंदे म्हणाले.