Manoj Jarange Patil Speech: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची आज सराटी गावात आंदोलनस्थळी भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं. एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ज्यूस पिऊन जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. उत्तरादाखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जरांगे पाटील यांचे उपोषण सोडल्याबद्दल आभार मानले. मात्र, यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी दिल्लीत घडलेला एक किस्सा सांगताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात चालू असणाऱ्या कार्यवाहीबाबत माहिती दिली. “जे जे फायदे ओबीसींना मिळत आहेत. ते फायदे आपल्या समाजाला देण्याचं काम आपण करत आहोत. आपलं रद्द झालेलं आरक्षण मिळालं पाहिजी ही भूमिका सरकारची आहे. त्यासाठी जे काही चालू आहे, त्यावर मी स्पष्टपणे बोलू इच्छित नाही. जस्टिस शिंदे कमिटी त्यावर काम करत आहे. मराठवाड्यातील ज्यांच्याकडे जुनी प्रमाणपत्रं असतील, नोंदी असतील, काहींकडे नसतील…त्यासाठीच आपण जस्टिस शिंदे कमिटी स्थापन केली. जेणेकरून न्यायालयात काय टिकेल, काय नाही टिकणार याची माहिती त्यांच्याकडे असते. त्यांचं काम सुरू झालं आहे”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
मनोज जरांगेंनी कमिटीत एक सदस्य द्यावा – शिंदे
दरम्यान, यावेळी राज्य सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातल्या समितीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचा एक सदस्य द्यावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. “मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या कसा मागास आहे या सगळ्या गोष्टी ते तपासत आहेत. मी त्यांना सांगितलं की तुमचा एक माणूस त्या कमिटीत दिला तर अधिक फायदा होईल”, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी सांगितला ‘तो’ किस्सा!
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीत घडलेला एक किस्साही सांगितला. “मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषणाची दखल उच्च न्यायालयानेही घेतली आहे. त्यामुळे तुमचं आंदोलन सर्वांपर्यंत पोहोचलंय”, असं मुख्यमंत्री म्हणाले. “मी परवा दिल्लीत गेलो होतो. तिथेही मला विचारण्यात आलं, ये मनोज जरांगे पाटील है कौन? मी म्हटलं सामान्य कार्यकर्ता है.. तर म्हणाले, उसने तो सबको हिला के रख दिया है”, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगिताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.
मनोज जरांगेंनी अखेर उपोषण सोडलं; मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर घेतला निर्णय!
“सरकार देणारं आहे. मीही गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेला गरीब कार्यकर्ता आहे. साताऱ्यात आपलं गेल्यावेळी आंदोलन होतं, तेव्हा आमचे बाबा गावी तयारी करत होते. मी विचारलं काय करताय, कुठे चाललायत? तर ते म्हणे मोर्चाला चाललोय. मी म्हटलं कुठला मोर्चा? तर ते म्हणे मराठा क्रांती मोर्चा. माझे बाबा आजही आहेत, आंदोलनातही होते”, असा प्रसंगही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितला.