अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने आज चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विरोधकांनी नेहमीप्रमाणे या चहापानावर बहिष्कार घातला. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना आणि आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले.
विरोधकांच्या पत्रकार परिषदेतून त्यांची मानसिकता दिसून आली. आम्ही चहापानाला गेलो असतो तर महाराष्ट्र द्रोह झाला असता. मला त्यांना सांगायचा आहे की, दाऊदची बहिण हसिना पारकरला ज्यांनी चेक दिला. त्यांच्या मंत्र्यांनी राष्ट्रद्रोह केला, तरीही त्यांचा राजीनामा अजित पवार यांनी घेतला नाही. बरं झालं अजित पवारांसोबत चहा पिण्याची आमची वेळ टळली. कारण महाराष्ट्र द्रोह मोठा की देशद्रोह मोठा? सत्तेच्या बाहेर पडल्यामुळे अजित पवार वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांनी मानसिकता आम्ही समजू शकतो. मासा पाण्याविना तडफडतो, तशी सत्तेच्या बाहेर गेल्यानंतर विरोधकांची अवस्था झाली आहे, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
अजित पवारांसारखी मी दोन्हीकडून शपथ घेतली नाही
माझ्यावर निष्ठा बदलल्याचा आरोप केला जातो. पण मी अजित पवारांसारखे नाही केले. एकदा फडवणवीस यांच्यासोबत शपथ घेतली नंतर परत मविआकडून शपथ घेतली. मी बाळासाहेबांची भूमिका घेऊनच पुढे चाललो आहे. अजित पवारांनी आरोप करताना थोडे तारतम्य बाळगले पाहीजे. अनेक महत्त्वाच्या पदावर त्यांनी काम केलेल आहे. अनेकवेळेला ते म्हणतात की, सेनेतून बाहेर पडलेल्यांचे काय होणार बघा? काहीही होणार नाही. आम्ही शिवसेनाच आहोत. त्यामुळे विरोधकांच्या सर्व आरोपांना आम्ही सभागृहात उत्तर देऊ, असे आव्हान एकनाथ शिंदे यांनी दिले.
गिरीश महाजन आणि फडणवीसला आत घाला
मविआ सरकारच्या काळात गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीसला आत घाला, ही चर्चा माझ्यासमोर झाली. त्यावेळी मी काय म्हणालो, हे आज सांगणार नाही, असाही खुलासा एकनाथ शिंदे यांनी केला. दोन दोन मंत्री तुरुंगात गेले तरी मविआने त्यांचे राजीनामे घेतले नाही. आम्हाला घटनाबाह्य बोलण्याआधी मविआतील पक्षांनी स्वतः काय केले, याकडे लक्ष द्यावे. आम्ही राज्यभर जिथे जातो, तिथे लोकांचे घोळके भेटण्यासाठी येत आहेत. उगाच हे लोक येत नाही, अशी टीकाही एकनाथ शिंदे यांनी केली.