गेल्या १० दिवसांपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापलं होतं. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस सत्ताधारी व विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोप व खडाजंगीनं गाजला. विरोधकांनी केलेल्या आरोपांना शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा दावा करत त्यासंदर्भात आकडेवारी सादर केली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही एकनाथ शिंदे यांनी टोलेबाजी केली.

“विरोधक गोंधळलेल्या अवस्थेत”

यंदाच्या पूर्ण अधिवेशनात विरोधक गोंधळलेल्या अवस्थेत दिसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. “विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव वाचला. त्यात प्रकर्षाने काही गोष्टी जाणवल्या. विरोधी पक्ष अतिशय गोंधळलेल्या अवस्थेत आहे. कदाचित महाविकास आघाडीचे सगळे वरीष्ठ नेते दिल्लीत जागावाटपाच्या कामात व्यग्र असल्यामुळे त्यांना योग्य दिशा मिळाली नसेल. शिवाय दिशा सालियान प्रकरणात काही सदस्यांनी मतं मांडल्यामुळे आधीच दिशाहीन झालेल्या विरोधी पक्षाचं गलबत आणखीनच भरकटलेलं दिसलं”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“जलयुक्त शिवार योजनेवर विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. पण तीच योजना अनेक भागांमध्ये राबवण्याची मागणी केली गेली. त्यावरून विरोधी पक्ष किती गोंधळलेला आहे हे दिसतंय. वस्तूस्थिती जाणून घेऊन आरोप करायला हवेत. आरोपाला आरोप करण्यात अर्थ नाही”, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी विरोधकांना लक्ष्य केलं.

मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्षपदावरून टीका

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षण उपसमितीचं अध्यक्षपद आपल्याला मिळू नये यासाठी राजकारण झालं, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. “तेव्हा मी उपसमितीचा अध्यक्ष होऊ नये म्हणूनही पडद्याआडून प्रयत्न झाले. मी मराठा समाजासाठी काम करेन ही भीती तेव्हा अडीच वर्षांच्या मुख्यमंत्र्यांना आणि अशोक चव्हाणांना होती. मी तेव्हाही म्हटलं अशोक चव्हाण अध्यक्ष होतायत, तर होऊ द्या. जे काही साटंलोटं केलं, डावललं हा विषय झालागेला गंगेला मिळाला”, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात केली.

“माझे कुटुंब, माझी जबाबदारी. सर्व टेंडर सगे-सोयऱ्यांच्या घरी.. जनतेनं फिरावं दारोदारी.. अशा पद्धतीने काम करणारे लोक जनतेचं कसं भलं करू शकतात? रस्ते बनवणाऱ्या कंपनीला ऑक्सिजन पुरवण्याचं काम देऊन या मंडळींनी आरोग्य व्यवस्थेलाच रस्त्यावर आणलं आहे. आरोग्यव्यवस्था चोख आहे असं भासवून घरी बसणाऱ्यांनी देशात एक क्रमांकाचे मुख्यमंत्री असं प्रमाणपत्र मिळवलं. ते शेवटून पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री होते”, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

“आदित्यराजाच्या कृपेनं वरुणराजानं…”

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी कोविड काळात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप तत्कालीन मुख्यमंत्री व त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर केले. “कोविड काळात महापालिकेत झालेला भ्रष्टाचार म्हणजे मयताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे. या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा या अरेबियन नाईट्सच्या कथांपेक्षाही सुरस आहेत, अकल्पित आहेत”, अशी खोचक टिप्पणी एकनाथ शिंदेंनी केली.

“मी जर बोललो तर मग बेक्कार होईल”, विधानसभेत महाजन-वडेट्टीवार यांच्यात खडाजंगी; म्हणाले…

“आदित्य राजाच्या कृपेनं वरुण राजानं अक्षरश: टेंडरचा पाऊस पाडला. या प्रकरणातील एक महत्त्वाचं प्यादं हा रोमिन छेडा आहे. या कंपनीच्या सुरस कथांची सुरुवात जिजामाता उद्यानातील पेंग्विनपासून झाली. हायवे बनवणाऱ्या या कंपनीला पेंग्विनसाठीचं बांधकाम करण्याचं कंत्राट दिलं. रोमिन छेडाला तब्बल ५७ कंत्राटं देण्यात आली. रोमिनला पेंग्विनपाठोपाठ कोविडच्या कठीण काळात ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं कंत्राट देण्यात आलं. कोण आहे हा? कशासाठी दिलं? गंमत म्हणजे त्याचं बोरिवलीत परिहार डिपार्टमेंटल स्टोअर नावाचं कपड्यांचं दुकान होतं. कंत्राट मिळताच दोन टक्के पैसे ठेवून बाकीचे सगळे पैसे रोमिन छेडाच्या खात्यात वळवण्यात आले. पैशांच्या खेळांसाठी मुंबईकरांच्या जीवाशी किती खेळ करायचा?” असा धक्कादायक आरोप एकनाथ शिंदेंनी केला.

“याच कंपनीला पुढे महापालिकेच्या शाळांमध्ये वॉटर प्युरिफायरचं कामही देण्यात आलं. अंडर वॉटर लाईट, फिल्टर बसवण्याचंही काम देण्यात आलं. ज्यू हाऊसमध्ये हाऊसकीपिंगचं कामही देण्यात आलं. म्हणजे तो मल्टिटॅलेंटेड, मल्टिपर्पज माणूस आहे. सबका मालिक एक. आणखी बरीच कंत्राटं दिली आहेत. ते वाचून माझं डोकं गरगरायला लागलंय, तुमचंही डोकं ऐकून ऐकून गरगरायला लागेल”, असा टोला एकनाथ शिंदेंनी विरोधकांना लगावला.

Live Updates