मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंडिया आघाडीच्या शिवाजी पार्क मैदानातील सभेवर कडाडून टीका केली आहे. ज्यांना जनतेने आणि शिवसैनिकांनी दीड पावणेदोन वर्षांपूर्वी तडीपार केलं तेच लोक आता अब की बार तडीपारचा नारा देत आहेत असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला. राहुल गांधी यांचा ठाणे, मुंब्रा या ठिकाणी फ्लॉप शो झाला असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्यांना जनताच त्यांची जागा दाखवेल असंही एकनाथ शिंदे काही वेळापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.
उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो हे शब्द रविवारपासून बंद झाले. हिंदू बांधवांनो-भगिनींनो म्हणायला जीभ कचरली का? त्यांनी हे म्हणणं टाळलं त्यावरुन त्यावरुन पुन्हा लक्षात आलं की बाळासाहेबांचे विचार, त्यांची भूमिका, त्यांची विचारसरणी हे सगलं त्यांनी (उद्धव ठाकरे) सोडलं. त्यामुळे आम्हाला त्यांना सोडावं लागलं आणि मोठा निर्णय घेत बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा निर्णय घ्यावा लागला. यांना जनतेने दोन वर्षांपूर्वीच तडीपार केलं आहे हे आम्हाला काय तडीपार करणार?” असाही बोचरा प्रश्न एकनाथ शिंदेंनी विचारला आहे.
हे पण वाचा- “दोन पक्ष फोडून पुन्हा आलो”, या देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचं उत्तर, “हे घरफोडे…”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “राहुल गांधींनी हिंदूंचा अपमान केला आहे. जनता त्यांना जागा दाखवले. ५० ते ६० वर्षांत काँग्रेसने जे केलं नाही ते मोदींनी मागच्या १० वर्षांत करुन दाखवलं. त्याचा प्रत्यय आपल्याला येतोच आहे. देशाचा विकास आपल्यासमोर आहे. तसंच राज्यात दोन वर्षांत महायुतीने केलेलं काम आपल्या सगळ्यांच्या समोर आहे.” असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंची पत दिसली
उद्धव ठाकरेंना पाचच मिनिटं वेळ भाषणासाठी देण्यात आली होती. यावरुन त्यांची इंडिया आघाडीत किती पत आहे ते दिसलं. राहुल गांधी बोलत असताना तिथे बसलेल्या लोकांच्या चेहऱ्यांवर नैराश्य दिसत होतं. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळासमोर ही सभा झाली. तो काळा दिवस ठरला कारण ज्यांनी वीर सावरकरांचा, हिंदू धर्माचा, सनातन धर्माचा अपमान केला अशा लोकांसह उद्धव ठाकरे बसले होते. उद्धव ठाकरेंनी त्याबद्दलही माफी मागितली पाहिजे अशीही मागणी एकनाथ शिंदेंनी केली.