राज्याचं हिवाळी अधिवेश सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. बुधवारी सायंकाळी नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शिंदेंनी बंडखोरीबद्दल विधान करताना ठाकरेंचा थेट उल्लेख न करता टोला लगावला. सत्ता वगैरे असतानाही आम्ही बंड केलं त्यावेळी काही लोकांना वाटलं की यांचा कार्यक्रम झाला, असं म्हणत शिंदेंनी टीकाकारांचा समाचार घेतला.
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली जून महिन्यामध्ये झालेल्या बंडानंतर अनेकांना आता बंडखोर गटाचं काय होणार याबद्दल प्रचंड उत्सुकता होती अशी आठवण करुन दिली. “सत्ता आणि सगळ्या गोष्टी असताना (आम्ही बंड केलं) पुढे काही होईल याची बऱ्याच लोकांना चिंता होती. माझ्याबरोबर येणाऱ्यांना पण इतर बरेच लोक विचारत होते. काय होणार याची बऱ्याच लोकांना उत्सुकता होती. काही लोकांना वाटलं कार्यक्रम झाला यांचा. विकेट धडाधड पडतील. मला मात्र एकदम कॉनफिडन्स होता. विश्वास होता की जी भूमिका घेतलीय आम्ही बाळासाहेबांच्या विचारांची ती योग्य आहे. कुठेही आम्ही चुकीचं काम करत नाही,” असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं.
तसेच आम्ही वैचारिक स्तरावर बंडखोरीचा निर्णय घेतल्याचा मुद्दा शिंदेंनी पुन्हा अधोरेखित केला. सत्ता किंवा मुख्यमंत्रीपदासाठी हे बंड केलं नाही असं शिंदे म्हणाले. “सत्ता मिळावी किंवा मुख्यमंत्रीपद मिळावं ही भावना आमच्या मनामध्ये नव्हती. परंतु महाराष्ट्रात सामान्य लोकांना न्याय देण्याचं काम आम्हाला करायचं आहे,” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
एका प्रश्नाला उत्तर देताना सध्याचं सरकार हे सूडभावाने काम करत नसल्याचं शिंदेंनी सांगितलं. पत्रकाराने प्रश्नादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला. तोच धागा पकडून शिंदेंनी आधीचं सरकार सूडभावानेनं काम करायचं असा टोला लगावला. “देवेंद्रजींचा उल्लेख तुम्ही केला. ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या मंत्रीमंडळात मी मंत्री होतो. त्यांच्या कामाची पद्धत मी पाहिलेली आहे. कुठल्याही सूडबुद्धीने, सूड भावनेने, आकसापोटी त्यांनी काम केलेलं नाही. मात्र ते जेव्हा सत्तेत नव्हते तेव्हा सत्तेत असणाऱ्यांनी त्यांच्याबद्दल खूप वाईट विचार केला. पण त्यांना ती संधी मी मिळू दिली नाही. मी सत्तांतरच करुन टाकलं,” असं शिंदेंनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.