मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आलेलं आपण पाहिलं आहे. डोंबिवलीतही मनसेने दीपोत्सव ठेवला, तिथेच खासदार श्रीकांत शिंदे यांनीसुद्धा आपला कार्यक्रम ठेवला होता. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी डोबिंवलीतील मनसे कार्यालयाला भेट दिली होती. त्यातच आता श्रीकांत शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत.
श्रीकांत शिंदे हे मनसे आमदार राजू पाटील यांचे विरोधक मानले जातात. मात्र, श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीतील कार्यालयात भेट दिल्याने युतीच्या चर्चेला उधाण आलं होते. त्यात आज ( २५ ऑक्टोंबर ) श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरेंची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली आहे. दिवाळीनिमित्त ही सदिच्छा भेट असल्याचं बोललं जात आहे. भेटीनंतर राज ठाकरे सपत्नीक श्रीकांत शिंदे यांना सोडण्यासाठी ‘शिवतीर्थ’च्या बाहेर आले होते. मात्र, शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांच्या मागील काही दिवसांपासून राज ठाकरेंशी भेटी वाढल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्यात नवी युती दिसण्याची चिन्ह आहेत.
“कितीही विरोधक असलो तरीही…”
डोंबिवलीतील कार्यालयाला भेट दिल्यानंतर श्रीकांत शिंदे म्हणाले की, “तुम्ही नवीन अर्थ काढू नका. मनसेच्या माध्यमातून दरवर्षी येथे लायटिंग तसेच वेगवेगळे कार्यक्रम फडके रोडला घेण्यात येतात. चांगलं चित्र बघायला मिळतंय आपल्याला, विरोधक एकत्र आल्याने चांगल्या गोष्टी होतात. दिवाळीनिमित्त सर्वजण एकत्र आहोत, कितीही विरोधक असलो तरी एकमेकांच्या सूचना, आक्षेप घेऊन पुढे जायचं असते,” असेही श्रीकांत शिंदेंनी स्पष्ट केलं.
“आमची सर्वांची मनं जुळली आहेत, बाकी…”
तर श्रीकांत शिंदे यांच्या भेटीनंतर मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली होती. “श्रीकांत शिंदे यांनी आमच्या शहराध्यक्षाच्या विनंतीला मान देत कार्यालयाला भेट दिली. आम्ही राजकारणात विरोधक असलो तरी, दुश्मन नाही आहोत. शिंदे गट आणि भाजपाबरोबर युती करण्याचा निर्णय पक्षाध्यक्ष राज ठाकरे घेतीत. स्वतंत्र निवडणूका लढण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार आमची तयारी सुरु आहे. मात्र, त्यांनी सांगितलं भविष्यात युती करायची, त्यालाही आम्ही तयार आहोत. आमची सर्वांची मन जुळली आहेत, बाकी सर्वही जुळून येईल,” असेही राजू पाटील यांनी म्हटलं होतं.