मनसेतर्फे शिवाजी पार्कमध्ये दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या दीपोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ ऑक्टोबर रोजी हजेरी लावली. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील उपस्थित होते. यामुळे मनसे-शिंदे-भाजपा यांच्यात युती होणार का? अशा चर्चांणा उधाण आलं आहे. त्यातच आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनसेच्या कार्यालयाला भेट दिली आहे.

डोंबिवलीतील फडके रोड परिसरात ज्या ठिकाणी मनसेने दीपोत्सवाचे आयोजन केलं होतं, त्याच ठिकाणी श्रीकांत शिंदेंनी सुद्धा आपला कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमात भाजपाचे माजी उपमहापौर राहुल दामले, मनसेचे माजी विरोधी पक्ष नेते व गटनेते प्रकाश भोईर उपस्थित होते. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी पहिल्यांदाच मनसेच्या मध्यवर्ती शाखेत भेट दिली. श्रीकांत शिंदे यांच्या मनसे कार्यालयाला भेट दिल्याने राजकीय वर्तुळात युतीच्या चर्चा रंगल्या आहेत.

हेही वाचा : “अजित पवारांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, आणि…” उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून रामदास कदमांचं टीकास्र!

यावेळी बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, “तुम्ही नवीन अर्थ काढू नका. मनसेच्या माध्यमातून दरवर्षी येथे लायटिंग तसेच वेगवेगळे कार्यक्रम फडके रोडला घेण्यात येतात. चांगलं चित्र बघायला मिळतंय आपल्याला, विरोधक एकत्र आल्याने चांगल्या गोष्टी होतात. दिवाळीनिमित्त सर्वजण एकत्र आहोत, कितीही विरोधक असलो तरी एकमेकांच्या सूचना, आक्षेप घेऊन पुढे जायचं असते,” असेही श्रीकांत शिंदेंनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : “कुणी सांगितलं मी म्हातारा झालो, तुम्ही काय बघितलं?”, शरद पवारांची तुफान फटकेबाजी

दरम्यान, मनसेचे आमदार राजू पाटील हे श्रीकांत शिंदेंचे राजकीय विरोधक मानले जातात. मात्र, आता श्रीकांत शिंदेंनी मनसेशी जवळीक केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आगामी काळात काय राजकारण घडतं हे पाहावे लागणार आहे.

Story img Loader