CM Eknath Shinde on Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या मुंबई व आसपासच्या भागात वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील मुंबईच्या वेशीपर्यंत मराठा आरक्षणाचा मोर्चा घेऊन आले असून शुक्रवारी ते मुंबईत दाखल होणार आहेत. एकीकडे मुंबई पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली असताना दुसरीकडे त्यांनी मात्र मागणी मान्य न झाल्यास मुंबईत येण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची नेमकी भूमिका काय? याविषयी चर्चा सुरू झाली असून त्याबाबत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकारांनी मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेविषयी विचारणा केली असता त्यांनी त्यावर सरकारच्या आधीच्याच भूमिकेचा पुनरुच्चार केला. “मराठा आरक्षण सरकार देणार आहे. सरकारची भूमिका कालही तीच होती, आजही तीच होती. ओबीसी वगैरे अशा इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिलं जाणार आहे. त्या बाबतीत मागावसर्ग आयोग मोठ्या प्रमाणावर काम करतोय. १ लाख ४० हजार लोक ३ शिफ्टमध्ये काम करत आहेत. सर्वेक्षणाचं काम वेगाने चालू आहे. ज्या कुणबी नोंदी सापडतायत, त्यांना प्रमाणपत्र देण्याचं काम चालू आहे. विविध योजना देण्याचंही काम चालू आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदेंचं जरांगे पाटलांना आवाहन

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना आवाहन केलं आहे. “मनोज जरांगे पाटील यांना मी विनंती केली आहे की सरकार पूर्ण सकारात्मक आहे. आरक्षण देण्यासाठी सरकार काम करत आहे. विविध फायदे देत आहे. फक्त आश्वासन न देता ज्या सुविधा ओबीसींप्रमाणे मराठा समाजाला देणं आहे, त्या सुविधा दिल्या जात आहेत. त्यामुळेच मनोज जरांगे पाटलांना मी आवाहन केलंय की जर सरकार सकारात्मक नसेल, तर आंदोलन ठीक आहे. सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे सरकारला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे”, असं एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.

“एकदा मराठा आरक्षण मिळू द्या, आपल्याला विरोध करणाऱ्या एक एक नेत्याला…”, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

“मराठा बांधव-भगिनींना माझं आवाहन आहे की सरकार तुमचंच आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारं हे सरकार आहे. सध्या प्रशासकीय अधिकारी, विभागीय आयुक्त मनोज जरांगे पाटलाच्या संपर्कात आहेत. कुणबी नोंदींमध्ये काही सूचना येत आहेत. मराठा मागासवर्ग आयोगात सर्वेक्षणातून काही सूचना येत आहेत. या सर्व सूचनाही तातडीने अंमलात आणल्या जात आहेत”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde speaks on manoj jarange patil protest rally in mumbai on maratha reservation pmw
Show comments