महाविकास आघाडी सरकार कोसळून महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं आहे. पण शिवसेना पक्षात अंतर्गत बंड करण्यापूर्वी आपण तब्बल पाच वेळा चर्चा केली, असं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांनी टीकास्र सोडलं आहे.
महाविकास आघाडीने गेल्या अडीच वर्षात जेवढं काम केलं नाही, तेवढं काम आम्ही अवघ्या अडीच महिन्यात केलं. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आम्हाला मोठं यश मिळालं, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. ते जळगाव येथील पाळधी शासकीय विश्रामगृहाच्या लोकार्पण सोहळ्यातील जाहीर कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी केलेल्या भाषणात एकनाथ शिंदे म्हणाले की, काल ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा सगळ्यात आघाडीवर आहे. महाविकास आघाडी सरकारने गेल्या अडीच वर्षात सगळ्यांना फक्त घरात बसवण्याचं काम केलं आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून लोकांनी त्यांना त्यांच्या कामाची पोहोच पावती दिली आहे.महाराष्ट्रातील जनतेमुळं आम्हाला यश मिळालं आहे. पण ही तर केवळ झांकी आहे, पिक्चर अजून बाकी आहे.
हेही वाचा- “होय, मी रामदास कदमांच्या पाया पडलो”, भास्कर जाधवांनी सांगितला प्रसंग, म्हणाले…
गेल्या अडीच महिन्यात केलेल्या कामामुळे जनतेनं आमच्या बाजुने कौल दिला आहे. शिवसेनेनं २०१९ मध्ये असंगाशी संग केला होता. अजूनही आम्ही महाविकास आघाडीमध्ये राहिलो असतो, तर बोटावर मोजायलाही शिवसेना शिल्लक राहिली नसती. यावरून गुलाबराव पाटील मला म्हणाले होते, आपण सर्वजण एकत्र येऊन २०१९ ची चूक दुरुस्त करू… मी त्यांना म्हणालो, माझं पाच वेळा बोलून झालं आहे. आपण झोपलेल्या माणसाला जागं करू शकतो. झोपेचं सोंग घेणाऱ्यांना माणसाला कसं जागं करायचं? असा प्रसंग एकनाथ शिंदे यांनी सांगितला आहे.
हेही वाचा- “…तेव्हा एकनाथ शिंदेंना आपली चूक लक्षात येईल” भाजपाच सरकार पाडेल म्हणत जयंत पाटलांचं मोठं विधान
आम्ही शिवसेना-भाजपा युती म्हणून निवडणूक लढवली होती. आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदींचा फोटो लावून निवडणूक जिंकलो होतो. शरद पवार आणि सोनिया गांधींचे फोटो लावून निवडून आलो नव्हतो. आम्ही जर हे पाऊल उचललं नसतं तर काय परिस्थिती झाली असती, हे सर्वांना माहीत आहे. महाविकास आघाडीने गेल्या अडीच वर्षात जेवढी कामं केली नाहीत, तेवढी कामं आम्ही अडीच महिन्यात केली आहेत, आणखी दोन वर्षे बाकी आहेत. आता ते घाबरले आहेत. हा एकनाथ शिंदे सगळीकडे फिरतोय, त्यामुळे तेही फिरायला लागले आहे, असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.