ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून आज शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा केला. शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसाठी केलेल्या कामांचा पाढा वाचला. तसेच पक्षासाठी काम करत असताना कुटुंबाकडे कसं दुर्लक्ष झालं, हेही एकनाथ शिंदेंनी अधोरेखित केलं. यावेळी एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणातून आईच्या मृत्यूचा प्रसंग सांगितला आहे.
आईच्या मृत्यूचा प्रसंग सांगताना एकनाथ शिंदे भाषणात म्हणाले, “मला आठवतंय, लोकसभेची निवडणूक होती. माझी आई रुग्णालयात उपचार घेत होती. मी निवडणूक प्रचारात होतो. याचवेळी मला डॉक्टरांचा फोन आला. डॉक्टरांचा फोन आल्यानंतर माझ्या मनात पाल चुकचुकली. माझ्या बाजुला लोकसभेचे उमेदवार गावित होते. त्यांनी मला निवडणूक सभांचं वेळापत्रक सांगितलं. मी त्यांना म्हटलं, सभा किती वाजता संपतील? त्यांनी सांगितलं नऊ वाजतील.”
हेही वाचा- VIDEO : “एक नोटीस आली, तेव्हा XXX पातळ झाली, त्यामुळे…”, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा
“पण त्यांना मी कसं सांगू की, माझ्या आईचा जीव गेलाय. माझी आई या जगात नाही. मी त्यांना (गावित) सांगितलं, आपण सभा पूर्ण करू. मी सभा पूर्ण करून आलो आणि रुग्णालयात आईचं अंतिम दर्शन घेतलं. ही मी चूक केली का? असे अनेक प्रसंग आमच्या नेत्यांच्या जीवनात घडले आहेत,” असं एकनाथ शिंदे म्हणाले. आईच्या मृत्यूचा प्रसंग सांगतांना एकनाथ शिंदे भावनिक झाले.
हेही वाचा- “श्रीकांतने एकच गोष्ट मागितली, बाप म्हणून तीही देऊ शकलो नाही”, एकनाथ शिंदेंनी सांगितली आठवण
यावेळी एकनाथ शिंदेंनी मुलगा व खासदार श्रीकांत शिंदेंबाबतची एक जुनी आठवण सांगितली. डॉक्टर झाल्यानंतर श्रीकांत शिंदेंनी रुग्णालय बांधून देण्याची मागणी केली होती. पण बाप म्हणून मी त्याची मागणी पूर्ण करू शकलो नाही. रुग्णालय बांधायचा जेव्हा विचार करायचो, तेव्हा कोणती तरी निवडणूक यायची, अशी आठवण एकनाथ शिंदेंनी सांगितली.