लोकसभा निवडणुकांचे निकाल देशात जरी एनडीएच्या बाजूने लागले असले, तरी महाराष्ट्रात मात्र महायुतीची मोठी पीछेहाट झाली. एकट्या भाजपाच्या जागा २३ वरून ९ पर्यंत खाली आल्या असून महायुतीला राज्यात अवघ्या १७ जागा जिंकता आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार सरकारमधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. यासंदर्भात एकीकडे तर्क-वितर्कांना जोर आलेला असतानाच दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी रायगडावर केलेल्या कृतीमुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.

आज रायगडावर तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार आदी महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं शिवभक्त व सत्ताधारी पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्तेदेखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला.

कौतुक मोदींचं, टोला उद्धव ठाकरेंना!

“पंतप्रधान नरेंद्र मोदीही आपल्याला मदत करत आहेत. मंदिर वहीं बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे अशी चेष्टा करणाऱ्या लोकांची थोबाडं बंद करण्याचं काम पुन्हा पंतप्रधानांनी केलं. मंदिरही बनवलं, तारीखही सांगितली, उद्घाटनही केलं. ५००वर्षांपासूनचं राम मंदिराचं स्वप्न होतं. ते बाळासाहेब ठाकरेंचंही स्वप्न होतं, रामभक्तांचंही स्वप्न होतं. ते पूर्ण करण्याचं काम मोदींनी केलं. मी आपल्या सगळ्यांकडून त्यांना धन्यवाद देतो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. यातून मुख्यमंत्र्यांनी थेट उद्धव ठाकरेंना टोला लगावल्याचं बोललं जात आहे.

“हे राज्य शिवछत्रपतींच्या आदर्शांवर चालणारं आहे. महाराष्ट्राच्या घराघरांत, मनामनांत शिवछत्रपती आहेत. हे सरकार छत्रपतींच्या आशीर्वादानंच काम करतंय”, असं मुख्यमंत्री म्हणाले. “महाराजांच्या किल्ल्यांचं रक्षण, संवर्धन आणि संरक्षण करण्याचं काम राज्य सरकारने घेतलेलं आहे”, असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

“माझ्यासोबत अजितदादाही आहेत!”

दरम्यान, यावेळी सरकारच्या कामकाजाचं कौतुक करताना एकनाथ शिंदेंनी अचानक अजित पवारांचा हात उंचावून भाष्य केलं. “मी न बोलता जास्त काम करतो. मी जास्त बोलणार नाही. पण योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम मी करेन. तुम्ही खात्री बाळगा. हा शब्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर चालणाऱ्या मुख्यमंत्र्याचा आहे. आणि माझ्यासोबत अजितदादापण आहेत”, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी एवढा वेळ बाजूला उभ्या असलेल्या अजित पवारांचा हात हातात घेऊन उंचावून दाखवण्याचा प्रयत्न केला.

मनोज जरांगेंची भुजबळांवर बोचरी टीका, “काड्या टाकणारा तो आहे, मफलर आडवा टाकून..”

“छत्रपतींचा विषय निघतो तेव्हा मुनगंटीवारांच्या अंगात रोमांच उभा राहतो”

यावेळी अजित पवारांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पाहायला मिळालं. पण एकिकडे अजित पवारांच्या या स्मितहास्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात असताना दुसरीकडे उपस्थितांमध्ये मात्र मुख्यमंत्र्यांच्या या कृतीमुळे चांगलाच हशा पिकल्याचं दिलून आलं. यानंतर मुख्यमत्र्यांनी पुढे आणखी पुस्ती जोडत “माझ्यासोबत देवेंद्र फडणवीसही आहेत. आमचे सुधीर मुनगंटीवारही आहेत. शिवाजी महाराजांचा विषय निघतो तेव्हा सुधीर मुनगंटीवारांच्या अंगात रोमांच उभा राहतो. हे खरे शिवभक्त आहेत”, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी नमूद केलं. यावेळी सुधीन मुनगंटीवार यांनीही हसून या कौतुकाचा स्वीकार केला.