आज छत्रपती संभाजी नगरमध्ये उद्धव ठाकरेंनी शिवसंकल्प मेळावा घेतला. या मेळाव्यात गद्दार असा उल्लेख करत त्यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली. तसंच तुम्ही शिवसेनेचं चिन्ह चोरलं, पक्ष चोरला आणि माझ्या वडिलांचं नाव चोरून निवडून आलात अशी बोचरी टीका पुन्हा एकदा केली. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारलं असता लहान मुलासारखे किती दिवस रडणार आहात? असा सवाल करत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे.
उद्धव ठाकरे भाषणात काय म्हणाले?
“लोकसभेला जे निवडून आले त्या गद्दारांनी चोरुन विजय मिळवला आहे. शिवसेना चोरली, धनुष्यबाण चोरला. अरे चोरट्यांनो, भामट्यांनो तुमचा विजय हा खरा विजय नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंही तेच झालं, पक्ष चोरून अजित पवारांना दिला. शिवसेनाप्रमुखांचं नाव त्यांनी राष्ट्रपुरुषांच्या यादीत टाकलं. आपल्याला वाटलं की चला यांचा चांगला विचार आहे. पण त्यांच्या फोटोचा वापर करण्यासाठी यांनी हे कपट केलं. ग्रामीण भागात, शहरी भागात बाळासाहेबांचा फोटो लावायचा आणि धनुष्याबाण बाळासाहेबांचा आहे हे सांगून चोरुन मतं मागायची. मला अभिमान आहे मी ज्या जागा जिंकल्या त्याचा. अनेकांनी मला सांगितलं की आम्ही धनुष्यबाणाच्या चिन्हाला मतं दिली. कारण मशाल लोकांपर्यंत उशिरा पोहचली. आता मशालीच्या माध्यमांतून यांची पापं आपल्याला जाळायची आहेत. हे विसरु नका” असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. “गद्दार झालो तरीही चालेल पण मी खुर्ची सोडणार नाही हे यांचं (एकनाथ शिंदे) धोरण. मी उलट म्हणतो खुची गेली तरीही चालेल पण मी गद्दारी करणार नाही हे माझं तुम्हाला वचन आहे”. असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
हे पण वाचा- “आमचा पदाधिकारी असला तरी…”, वरळी अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
“कितीवेळा लहान बाळासारखं रडणार? ग्रामपंचायतीत लोकांनी त्यांना सहाव्या नंबरवर टाकलं. आमच्या शिवसेनेला जी बाळासाहेबांचे विचार मानते ती दुसऱ्या क्रमाकांवर होती. लोकसभा निवडणुकीतही लोकांनी दाखवून दिलं आम्हाला जास्त मतं मिळाली. १९ टक्केपैकी १४ टक्के मतं आमच्याकडे आली आहेत. पक्ष चोरला, चोरला हे किती वेळा बोलणार? लोकांनी सिद्ध केलं आहे की त्यांनी (उद्धव ठाकरे) बाळासाहेबांचे विचार सोडले. आम्ही १३ जागा उबाठाच्या समोर लढलो सात जिंकून आलो. त्यांच्यापेक्षा दोन लाख मतं जास्त आम्हाला मिळाला. त्यांचा स्ट्राईक रेट ४२ टक्के होता आमचा ४७ टक्के होता. लोकांनी शिक्कामोर्तब केलं आहे की शिवसेना किती आहे? किती रडणार आहात?”
अभद्र आघाडीचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल
“लोकसभेला ज्या जागा तुम्हाला (मविआ) कशा मिळाल्या, कुणामुळे मिळाल्या, कुठल्या व्होट बँकमुळे मिळाल्या ते महाराष्ट्राला माहीत आहे. मूळ मतदार आमच्याबरोबर आहे याची प्रचिती आता विधानसभेत त्यांना (उद्धव ठाकरे) येईल. विधानसभेत इतकी घसरण होईल की त्यांना कळेल की आपण काय चूक केली. अभद्र आघाडी केल्याचा परिणाम त्यांना भोगावा लागेल. जे गेटच्या बाहेर येत नव्हते ते आता शेतकऱ्यांना बांधावर जाऊन भेटू लागलेत याचा आनंद आहे. महिला भगिनींना आम्ही जे १५०० रुपये देण्याची योजना आणली आहे, तीन सिलिंडर मोफत ही योजना आणली ती भाऊबीज आहे, रक्षाबंधनाची भेट आहे. सन्मानाची भेट आहे. तुम्ही कधी काही दिलं नाही. तुमची देण्याची दानतही नाही. त्यामुळे ही योजना कायमस्वरुपी आहे. पापाचा घडा कुणाचा भरला ते विधानसभेला जनता ठरवणार आहे. त्यांचं अडीच वर्षांचं काम बघा, आमचं दोन वर्षांचं काम पाहा, जनता तुलना करेल.” असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे.