मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार मागील काही काळापासून त्यांच्या वक्तव्यांसाठी चर्चेत आहेत. आता अशाच प्रकारे बुलढाण्याचे शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड हे चर्चेत आले असून त्यांनी विरोधकांवर टीका करताना वादग्रस्त विधान केलं आहे. विशेष म्हणजे पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना गायकवाड यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं.
गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी विरोधकांच्या एकजुटीसंदर्भात गायकवाड यांना प्रश्न विचारला. विरोधक आघाडी करुन तुमची राजकीय कोंडी करु शकतात. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विरोधक तुम्हाला लक्ष्य करु शकतात, अशा अर्थाने प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना गायकवाड यांनी तीन हिंदी वाक्यांचा उच्चार केला. मात्र यापैकी एका वाक्यामध्ये त्यांनी विरोधकांची तुलना तृतीयपंथीयांशी केली.
विरोधक युती करुन तुमची कोंडी करु शकतात असं विचारण्यात आलं असता गायकवाड यांनी, “वीरो के दुश्मन होते है, शेरों के ही दुश्मन होते हैं, हि** का कोई शत्रू होता हैं क्या?” असं विधान केलं. पुढे विरोधकांच्या युतीसंदर्भात बोलताना, “मला त्याचा काही फरक नाही पडतं. जे शिवसेना काँग्रेसच्या आघाडीसंदर्भात सुरु असेल त्यावर एवढं सांगेन की सच्चा बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचा हात काँग्रेसच्या चिन्हाकडे कधीच जाऊ शकत नाही. ज्यांच्या गेला तो बाळासाहेबांचा औलादच नाही,” असंही गायकवाड म्हणाले.
त्यानंतर पत्रकारांनी यापूर्वी तुमचं असं वक्तव्य होतं की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले तर त्यांना कोणीही हरवू शकत नाही. या प्रश्नावर गायकवाड यांनी अगदी हातवारे करुन, “ते राजकीय स्टेटमेंट होतं,” असं हसत सांगितलं. आता तुम्ही विधान फिरवाताय का? असा थेट प्रश्न पत्रकारांनी या प्रतिसादानंतर विचारला. त्यावर गायकवाड यांनी, “नाही स्टेटमेंट बदलण्याचा काही विषय नाही. तेव्हाही तोच विषय होता की जे शिवसैनिक बाळासाहेबांना मानतात त्यांचा हात तिकडे कधीच जाऊ शकत नाही. आता जे बाळासाहेबांचे नकली शिवसैनिक असतील किंवा जे फक्त ठेकेदारीसाठी गेले असतील अशांना काही फरक पडत नाही ते लोक कमर्शियल आहेत,” असा टोला लगावला.