राज्याच्या विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर सत्ताधारी व विरोधी पक्ष अशा दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी त्यांचं अभिनंदन करणारी भाषणं केली. यात पहिलं भाषण खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. या भाषणात मुख्यमंत्र्यांनी चौफेर टोलेबाजी केली. यावेळी विजय वडेट्टीवार, नाना पटोले या काँग्रेसच्या नेत्यांना टोला लगावतानाच अजित पवारांनाही त्यांनी मिश्किल शब्दांत कोपरखळी मारली.
“अजितदादा, बरोबर ना?”
यावेळी बाजूच्या बाकावर बसलेल्या अजित पवारांना मुख्यमंत्र्यांनी मिश्किल शब्दांत कोपरखळी मारली. “आमच्या सरकारने चांगले निर्णय घेतले जे यापूर्वी मागच्या अडीच वर्षांत अजित दादांच्या मनात घ्यावेसे वाटले असतील, तरी त्यांना घेता आले नाहीत. ते आम्ही एक वर्षांत घेतले. दादा घेतले ना? बरोबर ना?” असा प्रश्न एकनाथ शिंदेंनी अजित पवारांकडे बघून विचारताच सभागृहात हास्याची लकेर उमटली.
नाना पटोलेंना टोला
“नानांनाही मी सांगू इच्छितो की तुम्हीही मनाला लावून घेऊ नका. विजय वडेट्टीवारांना सारखं ना ना करू नका. त्यांना थोडं मोकळेपणानं काम करू द्या. नाना पटोलेंचा स्वभाव चांगला आहे. अध्यक्ष म्हणून त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सगळं बदललं. नानांनी जे केलं, ते राज्यासाठी चांगलं केलं. आम्ही तुमचे आभारी आहोत. ये अंदर की बात है. नाना हमारे साथ है असं नाही म्हणणार मी. नाना भांडतात. बोलतात. पण आम्ही भेटतो तेव्हा दिलखुलासपणे मनात काही न ठेवता वागणारा नेता म्हणून नानांचाही नावलौकिक आहे. त्यांना दुहेरी धन्यवाद देतो. कारण मी आत्ता इथे उभं राहून जे बोलतोय त्यामागे त्यांचाही काही प्रमाणात हात आहे. दिल्ली का तो बडा हाथ है”, अशी टिप्पणी एकनाथ शिंदेंनी यावेळी केली.
“मी पोटतिडकीनं भाषण करायचो आणि उत्तर शिवाजी पार्कहून…”, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला!
“विजय वडेट्टीवारांनी बाळासाहेबांचं ८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण हे तत्व शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेल्यानंतरची पाळलं. शेवटी बाळासाहेबांच्या विचारांनी एखादा कार्यकर्ता प्रभावित झाल्यानंतर तो जगाच्या कानाकोपऱ्यात गेला तरी तो तसाच वागत असतो. पण काही लोकांना बाळासाहेबांचा सहवास लाभला तरी त्यांच्यावर बाळासाहेबांच्या विचारांचे संस्कार दुर्दैवाने झालेले नाहीत. मी आज काही टीका करणार नाहीये. पण ही वस्तुस्थिती आहे”, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर टीका केली.