मी कोणावरही टीका करणार नाही मात्र कोणी किती टीका करायची हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे
वाई: राज्यात उद्योग आणि पर्यटन वाढीला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत.राज्यातील सत्ता बदलानंतर सरकारने मोठ्या प्रमाणात कामाला गती दिली आहे राज्य प्रगती पथावर असल्याचे आमच्या कामातून दिसेल मी कोणावरही टीका करणार नाही मात्र कोणी किती टीका करायची हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वर येथे सांगितले.
मुख्यमंत्री दोन दिवसांच्या खाजगी दौऱ्यावर सहकुटूंब आहेत.त्यांनी सायंकाळी साताऱ्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची महाबळेश्वर येथील राजभवनच्या दरबार हॉल मध्ये बैठक घेतली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी,मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा,पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आदी विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
दसरा मेळाव्याला राज्य सरकार परवानगी देत नसल्याची चर्चा असल्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांना विचारले असता त्यांनी आमचे शिवसेना भाजपाचे सरकार आहे,आणि दसऱ्याला अजून अवकाश आहे याबाबत लवकरच तुम्हाला कळेल असे सांगीतले.उद्धव ठाकरे आपल्यावर टीका करत असल्याबाबत विचारले असता मी कोणावर कोणतीही टीका करणार नाही मात्र माझे काम बोलेल.
आमच्या सरकारने कामाला गती घेतली असून आम्ही राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी अनेक ठोस निर्णय घेतले आहेत.
शेतकरी आत्महत्या होऊ नयेत यासाठी त्यांना मदतीसाठीच्या निर्णयात अनेक बदल केले आहेत.राज्यात उद्योग, रोजगार आणि पर्यटन वाढीला मोठी संधी आहे.त्यासाठी उद्योगपती रतन टाटा यांच्यासह अनेक उद्योगपतींशी मी स्वतः बोललो आहे.रस्ते विकासाला सरकारने प्राधान्य दिले आहे. पुण्याच्या चांदणी चौकातील काम लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याच्या व तो पर्यंत वाहतूक कोंडी होणार नाही अशा सूचना शुक्रवारी रात्री मी स्वतः जागेवर उभे राहून पुण्याच्या प्रशासनाला दिल्या आहेत.नीती आयोगातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजारो कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले.साताऱ्यासह राज्यातील गडकिल्यांच्या पुनर्रबांधणीला प्राधान्य देत असल्याचे सांगताना यासाठी पुरातत्व व वन विभागाशी बोललो आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा कास बामणोली दरे मार्गावर नव्याने पूल बांधून हा थेट रस्ता होणार आहे. यामुळे पर्यटन वाढीलाही मोठी मदत मिळणार आहे. सातारा हा एक दुर्गम डोंगराळ जिल्हा आहे.येथे पर्यटन आणि औद्योगिक विकास वाढीला चालना देण्यासाठी साताऱ्यात एमआयडीसी व एमटीडीसीचे क्षेत्रीय अधिकारी पद नव्याने निर्माण केले जाईल.महाबळेश्वर येथील प्रलंबित पर्यटन, सुशोभिकारण कामांना तातडीने निधी उपलब्ध केला आहे. सुरुर वाई महाबळेश्वर पोलादपूर हा सातशे कोटी रुपये खर्चाच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांच्या कामाला आज मंजुरी देण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी व बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांना केली आहे.यामुळे या भागारील रस्ते पावसाळ्यात खराब होणार नाहीत. कांदाटी खोऱ्याच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात येईल यामुळे कोयना धरण विस्थापित एकशे पाच गावांच्या विकासाला बळ येईल त्यांना मूलभूत सेवा मिळतील.याच भागात कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात सोळशी येथे साडेसात टीएमसी चे नवीन धरण प्रस्तावित केले असून त्याच्या सुरवातीच्या तांत्रिक कामांसाठी दोन कोटी रुपयांच्या खर्चाला तातडीची मंजुरी दिली आहे.यामुळे पाणी असूनही उन्हाळ्यातील या गावांचे पाण्याचे दुर्भिक्ष्य कमी होईल. बोडांरवाडी धरणाच्या मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुस्तकांचे गाव भिलारला ब वर्ग पर्यटन दर्जा देण्यात येईल.पर्यटन वाढीसाठी महाबळेश्वर,पाचगणी,कास पठारावरील कोणतेही अनधिकृत बांधकाम तोडण्यात येणार नाही. परिस्थिती पाहून निर्णय घेतले जातील मात्र नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.देवेंद्र फडणवीस यांना प्रशासनाचा चांगला अनुभव आहे त्याच्या बरोबरीने राज्याला प्रगती पथावर नेऊ.सद्या सर्व मंत्रिमंडळ एक्टिव्ह मोडवर आणि फिल्ड वर कामात असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
सरकार अधिवेशन काळात शेवटच्या दोन दिवसात सरकार रस्त्यावर आल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हणाल्याचे निदर्शनात आणून दिले असता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले पहिले चार दिवस कोण पायऱ्यांवर होते.मग शेवटी कोण पायरीवर आले असा टोला त्यांनी विरोधकांना दिला
आज महाबकेश्वर येथील राजभवनवर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी स्थानिक व लगतच्या जिल्ह्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.मात्र बैठकांना उशीर झाल्याने मुख्यमंत्री जाताना गोंधळ उडाल्याने अनेकांना कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे भेट मिळू शकली नाही.त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.