विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक आज मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत मित्र पक्षासोबत चर्चा करण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
शिवसेनेच्या आमदारांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या बैठकीत खासदार नरेश म्हस्के यांनी मित्र पक्षासोबत चर्चा करण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना देण्याचा प्रस्ताव मांडला. तर सिद्धेश कदम यांनी शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गट नेते, मुख्य प्रतोद, प्रतोद आणि इतर नेत्यांची निवड करण्याचे सर्वांधिकार मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना देण्याचा प्रस्ताव मांडला. या बैठकीला ऑनलाइन उपस्थित असलेले आमदार आणि कार्यकरिणीतील इतर सर्व सदस्यांनी या दोन्ही प्रस्तावांना अनुमोदन देऊन याबाबतचे सर्वांधिकार एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय एकमताने घेतला.
हेही वाचा >> Mahayuti vs Maha Vikas Aghadi Winner महायुती की महाविकास आघाडी? तुमच्या मतदारसंघात कोण ठरलं वरचढ? वाचा २८८ मतदारसंघांची संपूर्ण यादी!
महायुतीला घवघवीत यश
भारतीय जनता पक्षाला १३२ जागा मिळाल्या असून शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाला ५७, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला ४१ जागा मिळाल्या आहेत. म्हणजेच महायुतीची बेरीज २३० झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेना (उद्धव ठाकरे) २० जागा, काँग्रेस १६, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) १० जागांवर विजयी ठरले आहेत. म्हणजेच महाविकास आघाडीची बेरीज ५६ झाली आहे. म्हणजेच महाविकास आघाडीचा या निवडणुकीत दारूण पराभव झाल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे भाजपाच्या नेतृत्त्वात महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे.
वानखेडेवर नव्या सरकारचा शपथविधी?
b
राज्यातील जनतेने स्पष्ट बहुमत दिल्यानंतर आता महायुतीकडून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विद्यमान विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरपर्यंतच आहे. तत्पूर्वी नवं सरकार स्थापन करणं अपेक्षित आहे. २६ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन झालं नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. त्यामुळे महायुती २६ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करेल. भारतीय जनता पार्टी राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असून राज्यपाल या पक्षाला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करू शकतात. दरम्यान, अनेक वृत्तवाहिन्यांनी सूत्रांच्या हवाल्याने बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत की मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर नव्या सरकारचा शपथविधी होईल.