महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नावर विधीमंडळाने केलेल्या ठरावावर आज विधानपरिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर निवेदन केले. यावेळी कर्नाटक सरकारला खडेबोल सुनावत असतानाच शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोमणे लगावले. गेल्या काही दिवसांपासून शिंदे आणि ठाकरे यांच्यामध्ये सीमाप्रश्नावर कुणी आंदोलन केले यावरुन शाब्दिक चकमक सुरु आहे. त्याचाच पुढचा अंक आज विधानपरिषद सभागृहात पाहायला मिळाला. एकनाथ शिंदे यांच्या टोलेबाजीनंतर उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी अभिनंदनपर भाषण करताना शिंदे यांच्या टोमण्यांवर सव्याज उत्तर दिले, ज्यानंतर विधानपरिषद सभागृहात एकच गोंधळ झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकनाथ शिंदे आपल्या निवेदनात म्हणाले की, “कर्नाटक सीमावाद आंदोलनात मी तुरुंगात गेलो होतो. तरिही माझ्या आंदोलनावर काही लोक संशय घेण्याचे काम करत आहेत. ते म्हणतात (उद्धव ठाकरे), तेव्हा मी त्यांच्याकडे होतो. पण मी सांगू इच्छितो की, मी तेव्हाही शिवसेनेत होतो आणि आजही बाळासाहेबांच्या शिवसेनेत आहे. आजही माझ्या डोक्यात मुख्यमंत्रीपद गेलेले नाही. मी शिवसैनिकच आहे. काही घराबाहेर न पडणारे लोक आज रस्त्यावर आलेत, रस्त्यावरुन पायरीवर आलेत. याच्यातच आमचा विजय आहे.”

हे ही वाचा >> “मी असा विरोधी पक्षच पाहिलेला नाही जो स्वतःच्या काळातल्या गोष्टी….” देवेंद्र फडणवीस यांचा खोचक टोला

ते पुढे म्हणाले की, “आम्ही आनंद दिघेंच्या पठडीत तयार झालेले कार्यकर्ते आहोत. बाळासाहेबांनी देखील माझ्या आंदोलनाचे भाषणात कौतुक केलेले आहे. आजही त्याच्या क्लिप सोशल मीडियावर फिरतात. या एकनाथ शिंदेंने आयुष्य घालवलं संघटनेसाठी तेव्हा हे लोक कुठे होते? संकट आलं, पूर आला, कोविड आला तरी हा एकनाथ शिंदे रस्त्यावर उतरुन काम करत होता. जेव्हा काही लोक त्यांच्या सीमा ओलांडतात, तेव्हा मलाही सीमा ओलांडून बोलावं लागतं आणि म्हणून आमच्या संयमाला आमची हतबलता समजू नका. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. बोलत नाहीत तर थेट करुन दाखवतो, असा इशाराच एकनाथ शिंदे यांनी दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणानंतर आमदार अनिल परब बोलण्यासाठी उभे राहत शिंदे यांनी केलेल्या टोलेबाजीला उत्तर दिले. “मुख्यमंत्र्यांचे काम इतके जबरदस्त आहे की, त्याची ३३ देशांत दखल घेतली गेली. आपण कर्तृत्वावान आहात. आपण ५० लोक घेऊन गेलात आणि सरकार स्थापन केलं. त्यातला एक जरी पडला, तरी राजीनामा देईन, हे तुमचं वाक्य आहे. आपल्या कर्तृत्वाला आमचा सलाम आहे. फक्त एकच हात जोडून विनंती आहे, की बाळासाहेबांच्या पायावर हात ठेवा आणि सांगा की पुढच्या वेळी भाजपाच्या तिकिटावर आम्ही लढणार नाही. याच्यातले किती लोक भाजपाच्या तिकिटावर लढणार आहेत, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. तुम्ही तुमच्या जिवावर आम्हाला हरवलंत, तर आम्ही तुमचं स्वागत करू. आम्हाला अजिबात वाईट वाटणार नाही. पण भाजपाच्या मदतीने आम्हाला हरवणार असाल तर आम्हाला वाईट वाटेल.”

अनिल परब यांच्या शेरेबाजीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रत्युत्तर दिले. “तुम्ही निवडून आलात, तेव्हा यांचीच (भाजपाची) मदत लागली तुम्हाला. ज्या दिवशी बाळासाहेबांचे विचार सोडून तुम्ही खुर्चीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलात, त्या दिवशी बाळासाहेबांच्या पायाला हात लावायचाही अधिकार तुम्हाला राहिला नाही. तो अधिकार आम्हाला आहे.”

हे ही वाचा >> अनिल देशमुख १ वर्ष, १ महिना आणि २७ दिवसांनी अखेर तुरुंगाबाहेर, समर्थकांचा जल्लोष

शिंदे – परब यांच्यात शाब्दिक वाद वाढल्यानंतर दोन्ही बाजूच्या सदस्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब करुन सर्वांना चहाचे निमंत्रण दिले आणि वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde vs anil parab clash in maharashtra council kvg