मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धुळे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात आत्महत्या करणा-या धर्मा पाटील यांच्या वयोवृद्ध पत्नी आणि मुलाला केलेली अटक फडणवीस सरकारची ब्रिटिश मनोवृत्ती दाखवून देते अशा शब्दांमध्ये विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.


बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धुळे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी धर्मा पाटील यांच्या पत्नी सखुबाई आणि मुलगा नरेंद्र पाटील यांना ताब्यात घेतलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात नरेंद्र पाटील यांनी आक्रमक आंदोलन करु नये, यासाठी पोलिसांनी या दोघांना सकाळी सहा वाजल्यापासून पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं. सरकारच्या या कारवाईचा मुंडे यांनी निषेध नोंदवला आहे. ट्विटरद्वारे त्यांनी फडणवीस सरकारवर सणसणीत टीका केली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस दोंडाईचा परिसरातून निघून गेल्यानंतर सखूबाई व नरेंद्र पाटील यांना पोलिसांनी सोडले. मात्र, नरेंद्र पाटील यांनी पोलीस स्टेशनमधून परत जाण्यास नकार दिला. ‘मी 24 डिसेंबर रोजीच दोंडाईचा पोलिसांना लेखी लिहून दिले होते की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात आपण कोणत्याही गैरकायदेशीर मार्गाचा अवलंब करणार नाही. माझ्याकडून असे कोणत्याही प्रकारचे कृत्य होणार नाही. तरी मला आणि माझ्या आईला सकाळी सहा वाजेपासून पोलीस स्टेशनला विनाकारण बसवून ठेवले’, असे त्यांनी सांगितले. शिवाय , आता मंत्री आल्याशिवाय आपण हलणार नाही असा पवित्रा नरेंद्र पाटील यांनी घेतला होता. तसंच आता कुठलाही मंत्री गावात आल्यास मला आणि माझ्या कुटुंबाला असाच त्रास दिला जाणार का? असा सवालही नरेंद्र पाटील यांनी केला आहे.

80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांचा 28 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केल्याने मृत्यू झाला होता.

Story img Loader