राहाता : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे दोन हेलिपॅड व ८ वाहनतळ उभारण्यास व विमानतळाचे विस्तारीकरण, अद्ययावतीकरणास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत मान्यता दिली. महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या संचालक मंडळाची ९१ वी बैठक मुंबईत झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. प्राधिकरणच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

शिर्डी येथील विमानतळाच्या कार्गो टर्मिनलचे काम वेगाने सुरू आहे. नाशिकपासून शिर्डी विमानतळ जवळ असल्याने नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या वेळेस हवाई मार्गाने येणाऱ्या भाविकांना शिर्डी विमानतळ सोयीचे होणार आहे. त्यावेळी होणाऱ्या संभाव्य गर्दीचा विचार करून व नाशिक येथील विमानतळाची क्षमता लक्षात घेता शिर्डी विमानतळाचे विस्तारीकरण प्रस्तावास मान्यता देण्यात आली. यामध्ये ८ वाहनतळे, दोन हेलिपॅडसह टर्मिनलच्या अद्यावतीकरणाचा समावेश आहे. याचा फायदा कुंभमेळ्यादरम्यान येणारी विमाने व हेलिकॉप्टर सेवेसाठी होणार आहे. प्राधिकरणाचे संचालक तथा वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, परिवहनचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू आदी उपस्थित होते.