मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कोल्हापूर दौर्यात टोल रद्द होण्याबाबत ठोस विधान केले जाईल ही अपेक्षा फोल ठरली. उलट टोलप्रति कर्तव्याची जाणीव करुन देत मुख्यमंत्र्यांनी साऱ्यांनाच कडक शंब्दात फटकारले. कोल्हापूर बंद ठेवून स्वागत केले गेल्याने अस्वस्थ बनलेल्या मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर जिल्हयासाठी कसलीही नवी योजना वा निधी देण्याचे टाळून तोंडाला पाने पुसली. पक्षीय पातळीवरही मुख्यमंत्र्याचा दौरा अपयशी ठरला.
थेट पाईपलाईनच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री चव्हाण करवीर नगरीत आले होते. या योजनेसाठी कोणत्याप्रकारची पाईप लाईन वापरली जावी यावरुन नगरसेवकात मतभेद निर्माण झाले असून सभात्याग करण्यापर्यंत प्रकरण तापले होते. अर्थपुर्ण व्यवहाराची चर्चाही सुरु झाल्याने वाद धुमसत आहे. पण यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी कसलेही भाष्य केले नाही. उलट बाहेरच्यानी आम्हाला शिकवू नये असे विधान करीत गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी नवा वाद अंगावर ओढवून घेतला.
अगोदरच टोल प्रश्नावर जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ व सतेज पाटील हे दोन्ही मंत्री टिकेचे लक्ष्य बनले आहेत. मंत्रीद्वयानी मुख्यमंत्र्यादेखत टोल पंचगंगेत बुडविण्याची भाषा पुन्हा एकदा केली. मुख्यमंत्र्यांनी मात्र याकडे स्पष्टपणे कानाडोळा केला. रस्ते प्रकल्पाचा करार करताना डोळे उघडे होते, आता डोळेझाक कशासाठी असे म्हणत मुख्यमंत्री चव्हाण यांनी टोल रद्द करण्याची मागणी करणार्या मंत्र्यापासून ते आंदोलकांवर शाब्दीक फटके ओढले. मुख्यमंत्र्यांची टोलप्रश्नी रोखठोख भुमिका पाहता तो पुर्णत रद्द होण्याची शक्यताच मावळली आहे.
टोलप्रश्नी महापालिकेने टोल आकारणी करणे, लहान वाहने टोल आकारणीतून वगळणे, पेट्रोल-डिझेलवर सेस लावणे, महापालिकेने भूखंड विकून ठरलेल्या रक्कमेतील काही रक्कम अदा करणे आदी पर्याय असल्याचे मुख्यमंत्र्यानी नमूद केले आहेत.पण याबाबतचा निर्णय करण्यामुळे राज्यातील बीओटी तत्वावरील रस्ते प्रकल्पाचेच मातेरे होणार असल्याने आणि मंत्रीमंडळात कोल्हापूरातील टोलप्रश्नी टोकाचे मतभेद असल्याने यापकी एखादा निर्णय मुख्यमंत्री घेण्याची शक्यता नाही.
मुख्यमंत्र्याच्या दौर्याने दारुन अपेक्षाभंग झाला आहे. विशेष घटक योजनेतून 5-10 कोटीचा निधी दिल्याचे सांगून कामाच्या बाबींचा उल्लेख त्यांनी केला. अर्थात प्रत्येक जिल्हयाला असा निधा दिला जात असल्याने कोल्हापूरकरांच्या पदरी वेगळे ते काय पडले? खेरीज, टोल, एलबीटी, रखडलेली विकासकामे याबाबत सोईस्कर मौन राखत मुख्यमंत्र्यांनी बंदने स्वागत केल्याबद्दलचा राग व्यक्त केला. काँग्रेस पक्षाच्या पातळीवर मुख्यमंत्र्यांच्या दौर्यातून बेरजेचे राजकारणाची अपेक्षा होती. पण काँग्रेस मेळाव्यात गटबाजी व मतभेदाचे दर्शन घडले. टोल रद्द करण्याच्या पर्यायात सतेज पाटील व जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्यातील मतांतरे दिसून आलीत. आमदार महादेवराव महाडीक मेळाव्याकडे फिरकले नाहीत. महाडीक यांचे निकटवर्तीय सत्यजीत कदम उत्तर कोल्हापूर साठी इच्छुक असताना मेळाव्यात सर्वानीच निवडणूक लढविण्यापासून अलिप्त राहण्याची भूमिका घेणारे युवराज मालोजीराजे यांनाच बळेबळेच घोडयावर चढविण्याचा उठाठेव केली. यामुळे काँगेस पक्षार्तगत गटबाजी ऐन निवडणूकीच्या तोंडावर वाढीस लागण्याची चिन्हे आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्यात आश्वासनापेक्षा उपेक्षा वाटय़ाला
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कोल्हापूर दौर्यात टोल रद्द होण्याबाबत ठोस विधान केले जाईल ही अपेक्षा फोल ठरली. उलट टोलप्रति कर्तव्याची जाणीव करुन देत मुख्यमंत्र्यांनी साऱ्यांनाच कडक शंब्दात फटकारले.
First published on: 29-08-2014 at 02:25 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm prithviraj chavan tour in kolhapur