मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार असलेले गुलाबराव पाटील हे कायमच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी एका जाहीर भाषणामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसंदर्भात केलेलं विधान आता चर्चेत आलं आहे. कार्यकर्त्यांसमोर आपण आपल्या जीवावर निवडून येतो अशा अशयाचं विधान करताना गुलाबराव पाटील यांनी मुस्लीम मतदार आपल्याला बाळासाहेबांचं काय करायचं आहे आपल्यासाठी गुलाबरावच सर्वकाही आहेत, असा विचार करुन मला मतदान करतात असं म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या हंगमी अध्यक्षा सोनिया गांधी यांचाही उल्लेख पाटील यांनी केला आहे.
नक्की वाचा >> Andheri Bypoll: …म्हणून भाजपाकडे उमेदवार मागे घेण्यासाठी, बिनविरोध निवडणुकीसाठी विनंती केली नाही; उद्धव ठाकरेंचा खुलासा
सिल्लोडमध्ये गुलाबराव पाटील यांनी केलेल्या भाषणामध्ये अनेकदा स्थानिक जनतेचं काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी लोक उभे राहतात याबद्दल बोलत होते. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून होणाऱ्या टीकेचाही समाचार घेतला. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीनंतर अनेकदा गुलाबराव पाटील हे पानटपरी चालवायचे असा उल्लेख केला होता. यावरुनच पानटपरी चालवायचा त्याला आम्ही आमदार केलं अशी टीका झाल्याचा संदर्भ देत गुलाबराव पाटलांनी, “३ लाख ८० हजार मतांचा मतदारसंघ आहे. तुम्ही दिसायलाही वाईट नाहीत फार छान दिसता. एकाने विचारलं लोक तुम्हाला का निवडून देतात? कोणत्याही पक्षाने तिकीट दिलेलं असो पण ५० टक्के हे उमेदवारावरही असतं,” असं म्हटलं.
नक्की वाचा >> “मुंबई पालिकेच्या निवडणुका लवकर लागल्या तर निवडणूक आयोगाला…”; ‘धनुष्यबाणा’संदर्भात उज्ज्वल निकम यांचं मोठं विधान
तसेच पुढे बोलताना गुलाबराव पाटील यांनी अनेक मुस्लीम आपल्याला काम पाहून मतदान करतात असं म्हटलं. जळगाव ग्रामीण मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गुलाबराव पाटील यांनी मतदारसंघातील ९० टक्के मुस्लीम हे आपल्याला काम पासून मत देतात असं म्हटलं आहे. “मी ज्या मतदारसंघातून निवडून येतो तिथं ९० टक्के मुस्लिम मला मतं देतात. ते म्हणतात, अपने को क्या करना है तीर कमान से, बालासाहाब से, शरद पवार से, सोनिया गांधी से अपना गुलाबरावही सब है,” असंही गुलाबराव पाटील यांनी भाषणात म्हटलं.