शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्यांनी करोना, स्वबळाचा नारा, भाजपा आणि पश्चिम बंगाल निवडणुका या विषयांना हात घातला. स्वबळाच्या घोषणेवरून त्यांनी काँग्रेसला खडे बोल सुनावले. तर पश्चिम बंगाल निवडणूक निकालावरून भाजपाला कानपिचक्या दिल्या. त्याचबरोबर शिवसेना भवनाबाहेरील राड्यावरून त्यांनी भाजपाला अप्रत्यक्षरित्या टोला हाणला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“अनेकांच्या पोटात दुखतंय. पण शिवसेना त्यांना औषध देतंय. मी अनेकांचं अंतर्मन पाहिलं आहे. त्यामुळे अनुभवाचं गाठोडं घेऊन पुढे जात आहे. अनेक जण स्वबळाचा नारा देत आहेत. आपण पण स्वबळाचा नारा देऊ. न्याय मागण्यासाठी सुद्धा स्वबळ लागतं. अन्याय होतोय आणि न्याय मागण्यासाठी सुद्धा स्वबळ नाही. तलवार उचलण्याची हिम्मत नाही. आधी तलवार उचलण्याची ताकद तर कमव. मग वार कर. स्वबळाचा अर्थ माझ्यासाठी तो आहे. निवडणुका येतात जातात. जय पराजय होत असतो. कोण हारतं कोण जिंकतं. जिंकलं तर आनंद आहे. पण हारल्यानंतर सुद्धा पराभूत मानसिकता घात करते.” असा अप्रत्यक्षरित्या टोमणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला मारला.

“गेल्या निवडणुकीत दुर्दैवाने जे पराभूत झाले त्यांच्याशी मी संवाद साधला. त्यांना सांगितलं आपल्या समोरचा पराभूत हा शब्द काढा. पराभव हा निवडणुकीत झाला आहे. आपण मनाने खचलो नाही आहोत. मनाने खचला तो संपला. ते जे बळ आहे ते स्वबळ आहे. गेल्या ५५ वर्षात अनेक संकटं आली. आज सुद्धा संकटाचा सामना करतो. संकटाला मी घाबरलो तर मी शिवसैनिक कसा? संकटाला मी घाबरलो तर शिवसेनाप्रमुख आणि माँसाहेब मला माफ करणार नाहीत.संकटाच्या छाताडावर चालून जा. संकटावर चालून जायचं असेल तर आत्मविश्वास पाहीजे आणि स्वबळ पाहीजे. उद्धव ठाकरेंनी दिला स्वबळाचा नारा, नारा नाही हा आमचा हक्क आहे. आमचा अधिकार आहे. तो केवळ निवडणुकांशी संबंधित नाही. तर अन्यायाविरुद्ध वार करण्यासाठी आहे.” असं त्यांनी शिवसैनिकांना सांगितलं.

“घरातून करतोय तर एवढं काम होतंय, बाहेर पडलो तर….!” विरोधकांना उद्धव ठाकरेंचा खोचक टोला!

“शिवसेना जेव्हा नव्हती तेव्हा कार्यालयातील खिडक्या, दरवाजे मराठी माणसांसाठी बंद होत्या. त्या बंद दरवाज्यावर धडक मारून, तोडून कार्यालयात मराठी माणसं घुसवली. त्यांना न्याय मिळवून दिला. हे शिवसेनेचं कर्तुत्व मनगटात ताकद नसती तर काहीच होऊ शकलं नसतं. शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाला त्याच्या मनगटातल्या ताकदीची जाणीव करून दिली. त्यानंतर मराठी माणूस पेटून उठला. हा शिवसेनेचा इतिहास आहे. शिवसेनाप्रमुखाच्या लक्षात आलं, हिंदुत्वावर संकट आलं आहे. तेव्हा त्यांनी गर्व से कहो हम हिंदू है, असा नारा दिला. शिवसेनेने मराठी आणि हिंदुंना आधार दिला. हिंदुत्व आमचं राष्ट्रीयत्व आहे.आपण मराठी आहोत. कोण गुजराती आहे. आणखी कोण आहे. देशाचा पाया हा प्रादेशिक आस्मितेचा आहे. प्रादेशिक आस्मितेवर जर घाला आला. तर तडाके बसल्याशिवाय राहणार नाही. ” असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

“करोनाच्या काळातही शिवसेना पुढे सरसावली आहे. आपल्या महाराष्ट्रात तशा निवडणुका नाहीत. बंगालच्या ज्या निवडणुका झाल्या. स्वबळाचा अर्थ निवडणुका नुसतं जिंकणं नाही. ज्या पद्धतीने ममता बॅनर्जी लढल्या आणि जिंकल्या. त्यासाठी मला बंगाली जनतेचं कौतुक करायचं आहे. याला म्हणतात स्वबळ. त्यांनी बंगालची ताकद दाखवून दिली. निवडणुका होतात निवडणुका संपतात. कोण हरलं कोण जिंकलं. हा विषय गौण आहे. ज्या पद्धतीने निवडणुकीच्या काळामध्ये अनेक आरोप, अनेक हल्ले झाले. अंगावर झेलून सुद्धा बंगाली माणसाने आपलं मत निर्भिडपणाने मांडलं. त्याला म्हणतात खरं बळ. ज्या बंगालने स्वातंत्र्यांच्या वंदे मातरमचा मंत्र दिला होता. त्याच बंगालचे दाखवून दिलं.”, असं बोलताना त्यांनी पश्चिम बंगाल निवडणूक निकालावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं कौतुक करताना भाजपाला टोला हाणला.

“माझ्या शिवसेना कुटुंबातील माता भगिनी आणि बंधुंशी संवाद साधत आहे. त्यामुळे काही काळ मी मुख्यमंत्रिपद बाजूला ठेवतो आणि शिवसैनिकांशी संवाद आहे. जुन्या फळीतील शिवसैनिक मला मार्गदर्शन करत आहे. शिवसेनेसाठी तीन दिवस खूप महत्त्वाचे आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस, शिवसेनेचा वर्धापन दिन आणि मार्मिकचा वर्धापन दिवस.” असं त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला सांगितलं.

करोनाचं संकट पाहता सलग दुसऱ्या वर्षी वर्धापनदिनाचं ऑनलाईन आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शिवसेनेचे नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख आणि इतर पदाधिकारी त्यांच्या सूचना लक्षपूर्वक ऐकत होते. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यानंतर शिवसेना हा दुसरा वर्धापन दिन आहे. मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी १९६६ साली शिवसेनेची स्थापना करण्यात आली होती. शिवसेनेनं गेल्या ५५ वर्षात महाराष्ट्रासह देशभरात दबदबा निर्माण केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm uddhav thackeray address shivsena foundation day 55 years online rmt