CM Uddhav Thackeray Aurangabad Sabha Updates : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत भाजपासह विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. ढेकणं चिरडायला तोफेची गरज नसते, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेत्यांवर निशाणा साधला. तसेच भाजपाचा औरंगाबादमध्ये काढलेला आक्रोश मोर्चा जनतेसाठी नाही, तर हातातून सत्ता गेली त्यामुळे काढला होता, असा टोला लगावला. या सभेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक हजर राहिले. औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्य मैदानावर जागा न झाल्याने शहरातील इतर मैदानांवर मोठ्या स्क्रिन लावून शिवसैनिकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली.
भाजपाने हिंदूंचे सण न पाहता गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी महागाईविरोधात बंदची घोषणा केली होती. त्याला बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध केला आणि हिंदूंच्या सणांसोबत उभे राहिले : उद्धव ठाकरे
ईडी, सीबीआय लावा, पण काश्मीरमध्येही धाडी टाका. काश्मीरमध्ये पंडित भयभीत होऊन घरं सोडत आहेत, पण भाजपात एकही 'माय का लाल' नाही जो यावर बोलेल. इथं येऊन बांग्लादेशी येऊन राहत असतील, तर माझ्याच देशातील काश्मिरी पंडीतांना का राहता येत नाही : उद्धव ठाकरे
अच्छे दिन आले का? कधी येणार? काहीच नाही, ते झटकून टाकतात. निवडणुका आल्यानंतर नको त्या खपल्या काढल्या जातात. पुन्हा एकदा धर्माची अफूची गोळी द्यायची आणि धर्माच्या नावावर मतं मिळवून सत्तेवर यायचं, मतदार मेला तरी चालेल. निवडणुका आली की पुन्हा कोणती तरी मशीद पाडू म्हणजे सगळे पुन्हा त्यांच्या मागे, अशी भाजपाची थेरं आहेत : उद्धव ठाकरे
संभाजीनगरच्या विषयी एकदा गोपीनाथ मुंडे घरी आले होते. तेव्हा ते यावेळी महापौर आम्हाला द्या, अशी मागणी केली. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी एका क्षणात होकार दिला. ते कागदावर आकडेमोड करत बसले नाही : उद्धव ठाकरे
जो देशासाठी मरायला तयार असतो तो कोणत्याही धर्माचा असला तरी तो आमचा आहे. हे आमचं हिंदुत्व आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला मुसलमानांचा द्वेष करायला शिकवलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुराण सापडल्यावर त्याचा आदर केला. देशाची रक्षा करता करता औरंगजेब नावाचा जवानाने बलिदान दिलं. त्याला आम्ही परकं म्हणत नाही. तो आमचा आहे : उद्धव ठाकरे
हिंदुत्व भगव्या टोपीत असेल, तर संघ काळी टोपी का घालतं? भाजपा जर ऐकत नसेल तर संघाने त्यांच्या कानाखाली मारली पाहिजे. म्हणून मी संघावर टीका केली : उद्धव ठाकरे
भाजपाने आपल्या प्रवक्त्यांच्या डोक्यात मेंदू असेल तर त्यांना काही गोष्टी शिकवा. ते जी भाषा वापरत आहे ती भाषा आमचे प्रवक्ते वापरणारच नाही असं नाही. आमचा संयम सुटला तर तेही करू : उद्धव ठाकरे
मी आत्ताही शहराचं नाव बदलू शकतो, मात्र, नाव बदललं आणि पाणी प्रश्न तसाच राहिला, इतर प्रश्न तसेच राहिले तर संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील : उद्धव ठाकरे
निवडणुका जिंकायच्या म्हणून घाईत औरंगाबाद मेट्रो आणि इतर विकास कामांची घोषणा करणार नाही. व्यवस्थित नियोजन करून आराखडा तयार करणार आणि मगच विकास करणार आहे. विकासाच्या नावावर शहर उद्ध्वस्त करणार नाही : उद्धव ठाकरे
मी पहिल्यांदा औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर बोलणार आहे. मी पाणी प्रश्न असताना त्याकडे तोंड फिरवणार नाही. मी असा मूर्ख राजकारणी आहे जो या पाणी प्रश्नाला भिडतो आहे. कारण माझ्याकडे प्रामाणिकपणा आहे. किती वर्ष ऐकत बसणार? आता निधी मंजूर केलाय, वेळेत पाणी योजना पूर्ण झाली नाही, तर ठेकेदारांना दयामाया न करता तुरुंगात टाकणार आहे : उद्धव ठाकरे
ढेकणं चिरडायला तोफेची गरज नसते. त्यामुळे मला या सैनिकांची शक्तीही तिकडे वाया घालवायची नाही : उद्धव ठाकरे
शस्त्रक्रिया झाल्यानंतर ६ महिन्यांनी मुंबईबाहेर पाऊल टाकलं. हे पहिलं पाऊल मराठवाड्यात टाकलं. आजचा दिवस म्हणजे शिवसेनेने मराठवाड्यात पहिलं पाऊल टाकल्याचा आहे. एवढ्या वर्षांनीही शिवसेनेची ताकद तेवढीच आहे. उलट वाढत आहे. मैदानात बसायला जागा नाही. तुमच्या रुपाने तुळजाभवानीचं रुप पाहतो आहे : उद्धव ठाकरे
भाजपाचे नेते, जिल्हा परिषद सदस्य रामदास परोळकर, काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य संदीप सपकाळ, काँग्रेसचे कन्नड तालुका अध्यक्ष बाबा मोहिते यांचा शिवसेनेत प्रवेश
आक्रोश पाहायचा असेल तर भाजपाच्या नामर्द लोकांनी जम्मू काश्मीरमध्ये जाऊन आक्रोश पाहावा. रोज अतिरेक्यांचे हिंदूंवर भ्याड हल्ले होत आहेत. मागील २ महिन्यात काश्मीरमध्ये २७ काश्मिरी पंडीत, हिंदूंची घरात घुसून हत्या झाली आणि सरकार नामर्दासारखं हातावर हात ठेवून बसलंय : संजय राऊत
उद्धव ठाकरे यांचं सभेच्या मंचावर आगमन, संजय राऊत यांच्यासह शिवसेना नेत्यांकडून जोरदार घोषणाबाजी
औरंगाबादमधील जनसमुदायाच्या लाटांचा फटका भाजपाला बसला तर पाणी मागायला देखील उठणार नाही. उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी उठलेली जनतेची ही लाट दिल्लीला देखील झटका देईल. महाराष्ट्र कुणाचा हे सांगणारी ही सभा आहे. काहींनी याच मैदानात सभा घेऊन आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अजून जन्माला यायची आहे : संजय राऊत
संभाजीनगरमध्ये देखील मेट्रो आणणार आहे. या शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. आता शहरीकरण आधुनिक असावं यासाठी आंतरराष्ट्रीय सल्लागार कंपनी नेमणार आहे. ते नव्या संभाजीनगरचा आराखडा सादर करेल. सुपर संभाजीनगरचं स्वप्न साकारण्यासाठी जनतेने साथ द्यावी : सुभाष देसाई
औरंगाबादमधील विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्यासाठी प्रस्ताव दिला. मात्र, केंद्र सरकारकडून अद्याप मान्यता नाही. भाजपाच्या नेत्यांनी इथं फुगड्या घालण्यापेक्षा दिल्लीत जाऊन या मागणीला मान्यता मिळवण्यासाठी काम कराव : सुभाष देसाई
औरंगाबादमधील पाणी पातळी वाढली आहे. शहरासाठी उद्धव ठाकरे यांनी १,६८० कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर करत शहराचा पाणी प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतला. पाणी योजना वेळेत पूर्ण करून पाणी प्रश्न सोडवला नाही, तर ठेकेदाराला तुरुंगात टाकण्याचा इशारा दिला आहे. राणेंना ज्यांनी सोडलं नाही, तर या ठेकेदारांना काय सोडणार? : सुभाष देसाई
ही औरंगाबादची सभा पाहून शिवसेनेने शिवसेनेचेच रेकॉर्ड मोडले आहे. या मैदानात जागा शिल्लक न राहिल्याने शहरात इतर मैदानांवर मोठ्या स्क्रिन लावून ते सभा ऐकत आहेत. त्यामुळेच शिवसेने शिवसेनेचे गर्दीचे रेकॉर्ड मोडले. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जसं प्रेम केलं तसेच जनतेने उद्धव ठाकरेंवर केलं : सुभाष देसाई
जसा उद्धव ठाकरे यांना भाजपावाल्यांनी धोका दिला, तसाच धोका मला औरंगाबादमध्ये भाजपाने दिला. भाजपावाले मातोश्रीवर येत असतील, ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचं काम केलं. आम्ही ते सहन करणार नाही. किरीट सोमय्यांनी परत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली तर थोबाड लाल करू : चंद्रकातं खैरे
अर्जून खोतकर आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना एक विनंती आहे की, लोकसभा निवडणुकीत एकदा अर्जून बाणाने रावसाहेब दानवे यांचा राजकीय वध करू द्या. एक संधी द्या. त्या संधीचं सोनं केलं नाही, तर मला राजकारण करण्याचा अधिकार राहणार नाही : अब्दुल सत्तार
महाराष्ट्रातील संबंध दलित, कष्टकरी जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभी आहे आणि पुढील झंझावातात देखील आम्ही तुमच्यासोबत उभे राहू : अर्जून डांगळे
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दादरला असलेलं आंबेडकर चळवळीचं केंद्र कोणी पाडलं? कोणत्या बिल्डरच्या मदतीने आंबेडकर भवन पाडलं? भाजपाची भूमिका दुटप्पी आहे. उद्धव ठाकरे यांचं सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचं संवर्धन करत आहे : अर्जून डांगळे
हातातील सत्ता गेल्याने भाजपाची तडफड होतेय. अमित शाह आणि उद्धव ठाकरेंमध्ये सत्तावाटपाची बोलणी झाली तेव्हा मी हजर होतो. मात्र, हिंदुत्वात भागिदार नको म्हणून भाजपाने शिवसेनेला फसवलं. यानंतर उद्धव ठाकरे यांनी शरण जाण्यापेक्षा मी लढणं पसंत करेल असं सांगितलं : अर्जून डांगळे
ज्यांनी हनुमान चालिसा लिहिला त्या तुलसीदासांचे नातेवाईक मिश्रा यांनी हात जोडून हनुमान चालिसाचा वापर राजकारणासाठी करू नये अशी विनंती केली. भाजपा खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत आहे : अर्जून खोतकर
भाजपाचं हिंदुत्व खुर्चीचं आहे, बेगडी आहे. लोकांना सांगतात आपल्या राज्यात हनुमान चालिसा वाचायला बंदी आहे. किती खोटं बोलावयचं. मी दररोज दोनदा हनुमान चालिसा वाचतो. राज्यात आणि देशात हनुमान चालिसावरून वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला : अर्जून खोतकर
उद्धव ठाकरे आपल्या भाषणात अनेकांचा समाचार घेतील. शिवसेनेच्या ताकदीवर मोठी झालेली भाजपा आपले रंग दाखवत आहे. भाजपाच्या टीनपाट लोकांकडून रोज खोट्यानाट्या आरोपांचं सत्र सुरू आहे : अर्जून खोतकर
राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या निवडीवरून राजकारणाचा पारा चांगलाच चढला आहे. शिवसेनेसह महाविकासआघाडीने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. तसेच मंगळवारी (७ जून) सर्व आमदारांची बैठकही घेतली. यानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेना मांजर जसं पिलांना उचलून फिरते, तसं शिवसेना आमदारांना घेऊन फिरत असल्याचा टोला लगावला. यावर राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्रत्युत्तर दिलंय. ते बुधवारी (८ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या निवडीवरून राजकारणाचा पारा चांगलाच चढला आहे. शिवसेनेने देखील आपल्या दोन उमेदवारांची निश्चिती केली. यात मंत्री सुभाष देसाई यांच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे तुम्ही विधान परिषद निवडणुकीतून माघार का घेतली? असा प्रश्न सुभाष देसाई यांना औरंगाबादमध्ये विचारण्यात आला. यावर सुभाष देसाई यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. ते बुधवारी (८ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.