महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबईकडून विविध पदांच्या भरतीसाठी आज (रविवार) आयोजित केलेली परीक्षा अचानक रद्द करण्यात आली. या परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर येताच, या विभागाचे मंत्री गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी रात्री उशिरा परीक्षा रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली. तर, या प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाला सहा आरोपींना पकडण्यात यश आले आहे. यावरुन आता भाजपाने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणी मुख्यमंत्र्यावर सवाल उपस्थित केला आहे. “आरोग्य खात्याच्या परीक्षांचा बोजवारा उडाला, आता गृहनिर्माण खाते त्यांचा कित्ता गिरवत आहे. भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगली जात असताना मुख्यमंत्र्यांनी मौन पाळले आहे. माफी मागणाऱ्या नवाब मलिकांचे गुडगोईंग म्हणून कौतुक करणारे मुख्यमंत्री आव्हाड आणि टोपेंबाबत पक्षपात करत आहेत काय?” असा सवाल केशव उपाध्ये यांनी ट्विट करत विचारला आहे.
म्हाडा परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर येताच या प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाला सहा आरोपींना पकडण्यात यश आले आहे. या आरोपींना न्यायालयामध्ये हजर केले असता या सर्व आरोपींना न्यायालयाने १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे.
याआधी आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेतील प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणात आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीच प्रश्नपत्रिका फोडल्याचे समोर आले होते.
आरोग्य विभागाने खासगी कंपनीमार्फत पदभरती प्रक्रिया राबवली. या प्रक्रियेत वारंवार गोंधळ झाले होते. त्यानंतर गट क संवर्गातील विविध पदांसाठीची परीक्षा २४ ऑक्टोबरला, तर गट ड संवर्गातील विविध पदांसाठीची परीक्षा ३१ ऑक्टोबरला घेण्यात आली. त्यातील गट क संवर्गाच्या परीक्षेसाठी चार लाख ५ हजार १७९ उमेदवारांनी, तर गट ड संवर्गाच्या परीक्षेसाठी ४ लाख ६१ हजार ४९७ उमेदवारांनी अर्ज केले होते. परीक्षेपूर्वी झालेल्या गोंधळाप्रमाणेच परीक्षेच्या दिवशीही राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर गोंधळ झाला होता. तसेच प्रश्नपत्रिका समाजमाध्यमांवर फिरल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या प्रश्नपत्रिका फुटीबाबत आम आदमी पक्षाकडून पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. गेल्या काही दिवसांत पोलिसांनी केलेल्या तपासात दहापेक्षा अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसह उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे उघड झाले होते.