राज्यात शनिवारपासून म्हणजेच १ मे पासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू होणार की नाही? सुरू झालं तर ते व्यापक स्तरावर होणार की मर्यादित स्वरूपात? किती लोकांना आणि कुठे दिलं जाणार? असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोशल मीडियावरून जनतेशी संवाद साधताना उत्तर दिलं आहे. त्यासोबतच केंद्र सरकारकडे लसींचा पुरवठा वाढवण्याची मागणी देखील मुख्यमंत्र्यांनी केली आहे. “१८ ते ४४ वयोगटातील ६ कोटी नागरिकांच्या लसीकरणासाठी जे १२ कोटी डोस आपल्याला आवश्यक आहे. हे सर्व १२ कोटी डोस एक रकमी खरेदी करण्याची तयारी महाराष्ट्राची आहे. मी केंद्राला पुन्हा विनंती करतो की आमची पूर्ण तयारी आहे. कृपया आपण यात लक्ष घालून आम्हाला जास्तीत जास्त लसीचा साठा उपलब्ध करून दिला, तर महाराष्ट्र लवकरात लवकर या कोविडच्या संकटावर मात करून दाखवल्याशिवाय राहणार नाही”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
CM Uddhav Thackeray : राज्यातल्या सर्व जम्बो कोविड सेंटर्सच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश – मुख्यमंत्री
राज्याला लसीचे १८ लाख डोस मिळणार!
दरम्यान, १८ ते ४४ वयोगटासाठी राज्याला मे महिन्यात एकूण १८ लाख डोस मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. “१ मे पासून १८ ते ४४ या वयोगटातल्या नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी आपल्यावर टाकली आहे. या वयोगटातले सुमारे ६ कोटी नागरिक आपल्या राज्यात आहेत. म्हणजे आपल्याला १२ कोटी डोस लागणार आहेत. आर्थिक चणचण असली, तरी आपल्यासाठी नागरिकांचा जीव महत्त्वाचा आहे. जी किंमत असेल, ती एकरकमी देऊन ते लसीचे डोस घेण्याची तयारी आपण ठेवली आहे. आज जर आपल्याला १२ कोटी डोस कुणी देणार असेल, तर ती रक्कम एकरकमी देऊन ते डोस घेण्याची आपली तयारी आहे. पण या लसीच्या पुरवठ्याला मर्यादा आहेत. सीरम आणि भारत बायोटेकशी आपण बोलत आहोत. मे महिन्यात आपल्याला १८ लाखांच्या आसपास लसीचे डोस १८ ते ४४ वर्गासाठी मिळणार आहेत”, असं ते म्हणाले.
रेमडेसिविरचा अनावश्यक वापर टाळा – मुख्यमंत्र्यांचं आवाहन
“पुरवठा वाढेल, तसतशी संख्या वाढेल!”
राज्यात लसीकरणाविषयी सुरू असलेल्या चर्चेवर मुख्यमंत्र्यांनी यावेळी सविस्तर उत्तर दिलं. “सर्व वयोगटातल्या नागरिकांना लसीकरणाची सोय आपण करतो आहोत. गोंधळ होऊ नये म्हणून कुठेही गर्दी करू नका. ही लसीकरण केंद्र कोविड प्रसारक मंडळ होऊ नयेत अशी भिती वाटू लागली आहे. त्यामुळे हात जोडून विनंती करतो की उद्यापासून आपल्याला जसजशी लस उपलब्ध होईल, तसतशी आपण ही संख्या वाढवत जाणार आहोत. आपल्याकडे १८ ते ४४ वयोगटासाठी सध्या ३ लाख लसी आल्या आहेत. हे प्रमाण अत्यल्प आहे. आपल्याला दीड-दोन कोटी डोस महिन्याचे मिळाले, तर आपण दिवस-रात्र मेहनत करू. त्यामुळे कुठेही गोंधळ करू नका”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
१२ कोटी डोसचा खर्च ७ हजार ५०० कोटी!
दरम्यान, एकीकडे मुख्यमत्र्यांनी सर्व १२ कोटी डोसची किंमत एक रकमी चुकवण्याबाबत स्पष्ट केलं असलं, तरी एवढ्या डोसचा एकूण खर्च हा तब्बल ७ हजार ५०० कोटींच्या घरात जाणारा आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोनच दिवसांपूर्वी याविषयी माहिती दिली होती. “५ कोटी ७१ लाख लोकं हे या वयोगटातील आहेत. दोन लसींचे डोस द्यायचे असतील तर १२ कोटींच्यादरम्यान लसी लागणार आहेत. त्याचा खर्च साडेसात हजार कोटींच्या वर जाईल,” अशी माहिती टोपेंनी दिली आहे.