मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरासाठी मोठी ग्रंथसंपदा रवाना करण्यात आली आहे. कोकणात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे चिपळूण शहराचं अभूतपूर्व नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. याच महापुराच्या संकटामुळे या वाचन मंदिराच्या ग्रंथसंपदेचं प्रचंड नुकसान झालं होत. परंतु, आता या वाचनालयासाठी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने अडीच हजार पुस्तकं भेट दिली आहेत. ही ग्रंथसंपदा घेऊन जाणाऱ्या वाहनाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रवाना करण्यात आलं आहे.
१८६४ साली स्थापना, तर १५७ वर्षांची परंपरा
अतिवृष्टीमुळे चिपळूण शहरात महापुराचं पाणी शिरल्याने १८६४ साली स्थापन झालेल्या व १५७ वर्षांची परंपरा लाभलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातील पुस्तकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. हे नुकसान विचारात घेऊन वाचनसंस्कृतीचं वातावरण पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्यासाठी मराठी भाषा विभागाच्यावतीने या वाचनालयाला अडीच हजार पुस्तकं देण्यात येत असल्याची माहिती मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.
The floods in Chiplun damaged the books at the 157-year old Lokmanya Tilak Smarak Vachan Mandir. To restore the reading culture that the institution nurtured, the Marathi Language Dept has donated 2,500 books today. The vehicle was flagged off by CM Uddhav Balasaheb Thackeray. pic.twitter.com/BfQto59wth
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 26, 2021
वाचनसंस्कृती अखंडीत राहावी
अनेक वर्षाची समृद्ध वाचन परंपरा असलेल्या या वाचनालयाला मदत व्हावी, वाचकांना पुन्हा वाचनासाठी पुस्तकं उपलब्ध व्हावीत आणि वाचनसंस्कृती अखंडीत राहावी या हेतूने वाचनालयाला राज्य मराठी विकास संस्था व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ या कार्यालयांच्या पुढाकारातून मराठी भाषा विभागाकडून वैविध्यपूर्ण विषयांवरील तब्बल अडीच हजार पुस्तक भेट देण्यात आली आहेत.