कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांसाठी सरकराने भरीव मदतीचं पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर बोलताना “मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नसून मदत करणारा मुख्यमंत्री आहे”, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी आज कोल्हापूरमधल्या पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पूरस्थितीवरील कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आणि विरोधकांकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचं सांगितलं.

“मी सवंग लोकप्रियतेसाठी काही करणार नाही”

पावसामुळे आणि पुरामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीत सरकारकडून पॅकेज जाहीर केलं जावं, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित करताच, त्यावरून उद्धव ठाकरे यांनी लगेचच टोला लगावला. “मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाही. मी मदत करणारा मुख्यमंत्री आहे. माझे सहकारी मंत्री देखील मदत करणारे मंत्री आहेत. मी सवंग लोकप्रियतेसाठी काहीही करणार नाही हे आधीच सांगितलं आहे. अजूनही सांगली, कोल्हापूरमधलं पाणी पूर्ण ओसरायचं आहे. या संकटाचा पूर्ण अंदाज घेतल्यानंतर मदतीवर विचार करणार आहोत. तात्काळ मदत आम्ही जाहीर केलीच आहेत. एनडीआरएफचे निकष बदलण्याची गरज देखील मी पंतप्रधानांशी बोलताना व्यक्त केली आहे. हे एनडीआरएफचे निकष २०१५चे आहेत. गेल्या वेळी आपण एनडीआरएफच्या निकषांच्या पुढे जाऊन मदत केली आहे”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

“आता काही कठोर निर्णय घ्यावे लागतील”, पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा!

फडणवीस इथेच आहेत हे कळलं आणि मी…

“देवेंद्र फडणवीस इथेच आहेत हे मला कळलं. त्यांना मी सांगितलं थांबा मी येतोय. कारण मला लोकांच्या जिवाशी खेळ करायचा नाही. यात कुठेही मला राजकारण करायचं नाहीये. यात त्यांच्याही काही चांगल्या सूचना असतील, तर त्याचं स्वागतच करू. तिथे काही बंद दरवाजाआड आम्ही बोललो नाही. दरवाजेच नव्हते. सगळ्यांच्या घरात पाणीच घुसलं होतं, तर दरवाजे का राहतायत. मी त्यांना सांगितलं की तुम्हाला मी बोलवतो. मुंबईत आपण भेटू. ज्या सूचना असतील, त्यांच्यावर एकमत होईल. माझ्यासोबत तीन पक्ष आहेतच. तो चौथा पक्ष देखील येईल. महाराष्ट्रातले हे प्रमुख पक्ष एकत्र आल्यानंतर उद्या जे काही आपण निर्णय घेऊ, त्याच्या आड कुणीही येणार नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Story img Loader