राज्यात सत्तेत आल्यापासून शिवसेनेचा आक्रमकपणा कमी होऊन राजकारणात काहीसं सौम्य धोरण उतरल्याची चर्चा अनेकदा घडताना पाहायला मिळते. विशेषत: उद्धव ठाकरेंच्या पक्ष सांभाळण्याच्या आणि चालवण्याच्या शैलीवर नेहमीच राजकीय विश्लेषक निरनिराळे तर्क लढवत असतात. त्यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘लोकसत्ता’च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी उद्धव ठाकरेंची छोटेखानी मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य केलं.
बाळासाहेब ठाकरेंच्या काळातला आक्रमकपणा कुठे गेला?
शिवसेनेची शैली सौम्य झाल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा बदललेला स्वभाव जुन्या कट्टर शिवसैनिकांच्या पचनी पडला का? अशी विचारणा करताच उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचा कार्यकाळ आणि आत्ताची शिवसेना यामधला फरक सांगितला.
“तुम्हाला सगळंच पाहिजे, मग आम्ही धुणी-भांडी करायची का?” उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल!
“आवाज तोच आहे, पण पिढीप्रमाणे…”
“शिवसेनेचा आवाज तोच आहे. त्यातला खणखणीतपणाही तोच आहे. पण पिढीप्रमाणे थोडा बदल व्हायला हवा. मी शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडले नाहीत, ते कधीच सोडणार नाही. जनतेची सेवा करणारी आमची आदित्यला धरलं तर सहावी पिढी आहे. त्याच्या आधीही आमचे पूर्वज धोडपच्या किल्ल्याचे किल्लेदार होते असं म्हणतात”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
CM Uddhav Thackeray : पुन्हा भाजपासोबत युती होणार का? उद्धव ठाकरे म्हणतात…
“मला बाळासाहेबांसारखं बोलता येत नाही”
“माझ्यावर सुरुवातीला टीका झाली की याला बाळासाहेबांसारखं बोलता येत नाही. मला नाहीच येत. मी भाषण करतो असं मला अजूनही वाटत नाही. मला भाषण करताच येत नाही हे तुम्ही लोकांनीच ठरवून टाकलं हे बरंच झालं. प्रत्येक काळ वेगळा असतो. बाळासाहेबांचा काळ दगडाची मूर्ती तयार करण्याचा होता. आता मूर्ती बनल्यानंतर देखील त्या शिल्पकाराचा पोरगा त्या शिल्पावर घण घालत बसला, तर ती मूर्ती तुटेल. दगडाचीच मूर्ती होते. त्यानंतर तिच्यावर फुलं वाहायची असतात”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.