राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात पहिल्या टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (रविवारी) पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधला. करोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाी मुंबई लोकल प्रवासाची मुभा देण्याची यावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत होती. २२ एप्रिल २०२१ पासून सर्वसामान्य लोकांना मुंबई आणि परिसरात लोकल प्रवास बंद झाला होता. आता दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येणार आहे. ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन १४ दिवस झाले असतील, त्यांना आपण १५ ऑगस्टपासून लोकलमधून प्रवास करता येईल. अॅपद्वारे किंवा पालिकेच्या कार्यलयात पास उपलब्ध होणार आहे. हॉटेल रेस्टॉरंटबाबतचा निर्णय उद्या जाहीर होणार आहे. उद्या टास्क फोर्सच्या बैठकीनंतर हॉटेलबाबतचा निर्णय घेतला जाईल असं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
“कोविड काळामध्ये मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यासाठी निर्बंध टाकण्यात आले आहेत. यासंदर्भात अनेक प्रवासी संघटना तसेच नागरिकांनी वारंवार लोकल सेवा वापरण्यास परवानगी द्यावी अशी विनंती करत होते. तुम्हाला माहीतच आहे की, अद्याप आपण दुसऱ्या लाटेतून देखील पूर्णपणे सावरलेलो नाही. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका देखील आहे. केंद्र सरकारने देखील आपणास वारंवार याबाबत इशारा दिला आहे. मात्र तरीदेखील अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास आपण मान्यता देत आहोत.”, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. कुणीही अवैधरित्या, बेकायदेशीररित्या पासेस प्राप्त करून घेऊ नयेत. लसींचे दोन डोसेस घ्यावेत व प्रवास करावा, अशी विनंतीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 8, 2021
कसा मिळणार पास?
- लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येणार
- दुसऱ्या डोसनंतर १४ दिवसांचा कालावधी अनिवार्य आहे, त्यानंतरच प्रवासाला परवानगी देण्यात येणार
- स्मार्टफोनवर रेल्वे पास डाऊनलोड करण्याची सोय
- स्मार्टफोन नसल्यास प्रभाग कार्यालये, उपनगरीय रेल्वे स्थानकांवर फोटो पासेस
- पासवरील क्यूआर कोडमुळे अधिकृतता कळणार
“१५ ऑगस्टपासून मुंबईतल्या नागरिकांना लोकलचा उपयोग करता येईल. मात्र तो करताना पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांनी दोन डोस घेतले आहेत आणि लसीचे दोन डोस घेऊन त्यांना १४ दिवस झालेले आहेत. त्यांच्यासाठी पहिली आपण ही मुभा देत आहोत. आपण लसीकरण केलेल्या नागरिकांसाठी एक अॅप तयार केलेले आहे. लवकरच त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल अॅप्लीकेशन कसं करायचं? मुंबईतील विभागीय महापालिकेचे विभागीय कार्यालय मध्ये ऑफलाइन सिस्टीमने हे पास देणार आहोत. आज मुंबईमध्ये जवळपास १९ लाख नागरिक आहेत की ज्यांचे लसीचे दोन डोस झाले आहेत. १५ ऑगस्टनंतर प्रवासी वाढत जातील. टप्प्याटप्प्याने सर्व नागरिकांना लोकल सेवा उपलब्ध होईल”, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
गणेशोत्सव निर्बंधातच साजरा होण्याची शक्यता; अजित पवारांनी दिले संकेत
“गेल्या वर्षी एक वर्षभरामध्ये संकट नाहीसे होईल असं वाटत होतं. पण संकट अजून जाता जात नाही, कमी जास्त प्रमाणामध्ये या लाटा येत जात आहेत. किती लाटा येतील किती वेळा आपल्यावर धडकणार आहेत याचा अजूनही अंदाज देता येत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या स्वातंत्र्यदिनाच्या आठ दिवस आधीच मी आपल्याला एक नम्र विनंती करते की, तो सगळा संघर्ष त्याच्या नुसत्या आठवणी जागवून उपयोग नाही. करोनाची दहशतची टांगती तलवार अजूनही आपल्यावर आहे. तिचा कायमस्वरूपी नायनाट करावाच लागेल” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
काही ठिकाणी निर्बंध शिथील पण…
राज्यात सिंधुदुर्ग रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, बीड, पुणे, सांगली अशा काही जिल्ह्यात अजून कोरोना संसर्ग वाढता आहे ते जिल्हे सोडून उर्वरित ठिकाणी काही निर्बंध शिथील केले आहेत. कोरोनामुक्त गावासारखी संकल्पना आपण राबवित आहोत. अनेकांनी यादिशेने योग्य पाऊले टाकायला सुरुवातही केली आहे. उद्योजक, कंपन्यांनी आपल्या कामाच्या वेळा बदलून शिफ्टमध्ये कामगारांना बोलवावे, शक्य असलेल्या कंपन्यांनी त्यांच्या कामगारांची राहण्याची सोय त्यांच्या कॅम्पसमध्येच करावी अशी विनंती केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
टास्कफोर्सच्या बैठकीनंतर निर्णय
रेस्टॉरंट, मॉल, प्रार्थनास्थळे याबाबत टास्कफोर्सशी चर्चा करून निर्णय घेऊ असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील जनतेने राज्य शासनाला आतापर्यंत सहकार्य केले म्हणूनच मुंबई मॉडेलचे, महाराष्ट्राचे कौतूक जगभर झाले. याचे सर्व श्रेय माझे नसून राज्यातील जनतेचे असल्याचेही ते म्हणाले.