सौरभ कुलश्रेष्ठ, नागपूर
‘जनादेश हे शेवटी राजकारण आहे. या राजकारणामध्ये कदाचित आम्ही चुकत होतो. त्यामुळे इतकी वर्षे धर्म आणि राजकारण एकत्र करत होतो. याचे फटके कुठे तरी आम्हाला पडले’, अशी कबुली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना विधानसभेत दिली.
राजकारण हा जुगार असतो हे आम्ही विसरलो. धर्मराजही जुगारात हरलेला होता. जुगार हा जुगारासारखा खेळायचा असतो. हे विसरून कुठे तरी धर्म आणि राजकारण एकत्र करत होतो, असे उद्धव म्हणाले. आमचे धर्मातर झालेले नाही. आम्ही कालही हिंदू होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू. तो भाग वेगळा. पण सरकार चालवताना किमान
समान कार्यक्रम हाती घ्यावा लागतो, असे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीचे सरकार हे गोरगरिबांचे असून त्यांना बुलेट ट्रेन नव्हे रिक्षाच परवडते, अशी फटकेबाजी करत चहापेक्षा किटली गरम हे एकवेळ समजून घेऊ , पण किटली पुसणारे फडकेही गरम व्हायला लागले आहे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेची संधी साधत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्तांतरावरून शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. चर्चेला उत्तर देताना संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ज्ञानेश्वर यांच्या उक्तींचा आधार घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस, भाजपला प्रत्युत्तर दिले. हे सरकार पाच वर्षे टिकेल. आम्ही दिलेला शब्द पाळणारे असून शेतकऱ्यांना चिंतामुक्त करणारच, याचा पुनरुच्चार करत दिलेल्या शब्दाचे कौतुक फडणवीस यांना कधीपासून वाटू लागले, असा चिमटा ठाकरे यांनी काढला. कमी बोलायचे व जास्त काम करायचे. काही लोक खूप बोलतात व त्यात मागे काय बोललो हेच विसरतात, असा टोलाही ठाकरे यांनी फडणवीस यांना लगावला. स्वत:चे वर्णन उद्धव ठाकरे यांनी ‘नया है वह’ या शब्दांत केले. लाखो जीवा उद्धारतो या तुकडोजी महाराजांच्या संदेशाप्रमाणे आमचे सरकार काम करेल, असे आश्वासनही ठाकरे यांनी दिले. मात्र, ठाकरे यांच्या भाषणात शेतकऱ्यांना मदतीबाबत स्पष्ट आश्वासन नसल्याने त्याने समाधान झाले नसल्याचे सांगत भाजपने गोंधळ घालत सभात्याग केला.
हे माझे नव्हे तर आमचे सरकार आहे. स्थगितीचे नाही तर प्रगतीची गीता सांगणारे सरकार आहे, असेही ठाकरे म्हणाले. संत गाडगेबाबा यांनी भुकेल्यांना अन्न द्या, बेघरांना आसरा द्या, बेरोजगारांना काम द्या, निरंतर उद्योग करा, असा संदेश दिला असून सरकारने लोकांसाठी काय केले पाहिजे हेच एकप्रकारे सांगितले आहे. महाविकास आघाडीचे सरकार त्याच पद्धतीने काम करेल, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.
शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार हा शब्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिला होता. तो टोकाला जाऊन पाळला, असेही ठाकरे यांनी नमूद केले. श्रीराम लागू यांच्या ‘सामना’ या चित्रपटातील ‘कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे’ या गाण्याचा संदर्भ देत सेनेने युतीमधील भाजपचे ओझे उतरवून टाकल्याचे ठाकरे म्हणाले.
मागील सरकारमध्ये उद्योगमंत्रीपदी शिवसेनेचे सुभाष देसाई होते, पण दुसरीकडे कसाई होते. नोटबंदी व जीएसटीमुळे महाराष्ट्रात येणारे उद्योग परत गेले. आताही देशाची अर्थव्यवस्था कोमामध्ये आहे, असे विधान पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागार करत आहेत, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.
मुख्यमंत्र्यांचे भाषण संपल्यावर ‘उद्धवजी शेतकऱ्यांना २५ हजार देईचिना, बहुत बोलले पण काय बोलले हे समजेचिना ‘असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच ठाकरे यांचे भाषण हे शिवाजी पार्कवरील सभेसारखे झाल्याची टीका फडणवीस यांनी केली.
‘सावरकरांचे गाईबद्दलचे विचार भाजपला मान्य आहेत का?’
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून शिवसेना-कॉंग्रेसमधील मतभेदांवरून भाजपने शिवसेनेची सातत्याने कोंडी केली होती. उद्धव ठाकरे यांनी सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील मतभेदांच्या मर्मावर बोट ठेवत भाजपची कोंडी केली. सावरकरांचे नाव घेणाऱ्या भाजपला त्यांचे गाय ही गोमाता नसून उपयुक्त पशू असल्याचे मत मान्य आहे का, असा सवाल ठाकरे यांनी केला. गोमांसबंदीच्या कायद्यावरून राज्यागणिक वेगळी भूमिका घेण्यावरून ठाकरे यांनी भाजपला टोले लगावले. ‘महाराष्ट्रात गोमाता आणि शेजारी जाऊन खाता’, अशी बोचरी टीका करताना गोव्याचा संदर्भ दिला. गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी राज्यात गोमांस कमी पडू देणार नाही, असे विधान केले होते. तर केंद्रीय मंत्री व अरुणाचल प्रदेशमधील भाजपचे नेते किरण रिजिजू यांनी उघडपणे हो मी गोमांस खातो व खाणार असे विधान केले होते, याची आठवण ठाकरे यांनी करून दिली.
काव्यमय कोपरखळ्या
– सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धवा अजब तुझे सरकार असा चिमटा काढला होता. त्याचा उल्लेख करत सुधीरभाऊ नका होऊ इतके अधीर, झालात तुम्ही बेकार म्हणून अजब वाटते आमचे सरकार, असा टोला लगावला.
– देवेंद्र फडणवीस यांनी ज्ञानदेवांच्या भारुडाचा आधार घेत ठाकरे सरकारवर टीका केली होती. त्यास उत्तर देताना, त्याच भारुडाचे विडंबन करत, अच्छे दिन येता येईचिना, खात्यावर १५ लाख जमा होईचिना, बेकारी हटेचिना, परदेशातील काळा पैसा येईचिना, अशी फटेबाजी उद्धव ठाकरे यांनी केली.
बाहेरून आलेल्या हिंदूंना कुठे आश्रय देणार?
बाहेरील देशातील हिंदूंना न्याय देण्यासाठी केंद्र सरकारने नागरिकतेच्या कायद्यात दुरुस्ती केली. पण देशातील हिंदूंना कधी न्याय देणार, असा सवाल ठाकरे यांनी केला. बाहेरील हिंदूंना नागरिकतेचा हक्क दिल्यावर त्यांना आश्रय कुठे देणार ते सांगा, असा सवालही त्यांनी केंद्र सरकारला केला. बेळगाव, कारवार या सीमाभागातील मराठी बांधवांवर आजही भाषेच्या आधारावर अन्याय होत आहे. बेळगाव, कारवारमध्ये राहणारे मराठी भाषक हे हिंदू नाहीत का, असे विचारत सीमा भागाला त्यांनी कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र असे संबोधित केले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून त्यात गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने महाराष्ट्राची नव्हे तर कर्नाटकची बाजू घेतल्याची टीकाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली.