राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत असून त्याआधी राज्यातलं राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेमुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. त्यातच संध्याकाळी उशिरा सत्ताधारी पक्षाच्या झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपावर परखड शब्दांमध्ये टीकास्त्र सोडलं आहे. “३० वर्ष सापाच्या पिलाला दूध पाजलं, ते वळवळ करत होतं, आता आमच्यावरच फुत्कारतंय”, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपाला सुनावलं आहे.
देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांना झालेली अटक आणि दाऊदशी संबंधित व्यक्तींसोबत त्यांनी केलेला जागेचा व्यवहार यावरून निशाणा साधला होता. त्यावरूनच आता मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं आहे. “सध्या देशात एक घृणास्पद राजकारण सुरू आहे. तुमच्यात हिंमत असेल तर दाऊदला शोधून का आणत नाही तुम्ही? पाकिस्तानला जाऊन नवाज शरीफचा केक खाता, थडग्यांवर माथा टेकवता, मग तुम्ही दाऊदच्या मुसक्या का आवळत नाही?” असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी बैठकीमध्ये बोलताना उपस्थित केला आहे.
“तुमच्यातले काही दाऊदच्या घरची धुणीभांडी…”, देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर!
मुख्यमंत्र्यांनी भाजपाला दिलं खुलं आव्हान!
दरम्यान, यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपाला खुलं आव्हान दिलं आहे. “सध्या धाडी पडत आहेत. याला-त्याला अटक केली जात आहे. पण आता हे खपवून घेतलं जाणार नाही. आम्ही कुणावर वार करत नाही, पण कुणी केला, तर त्याला आम्ही सोडणार नाही. आपली एकजूटच आपली ताकद आहे. तुम्ही सरकार पाडणार वगैरे म्हणताय. माझे १७० मोहरे फोडून दाखवाच. मला सोडून ते तुमची गुलामगिरी पत्करणार नाहीत”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
“अजित पवारांच्या शब्दाला किंमत राहिलेली नाही”, देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांवर साधला निशाणा!
ज्यांनी दाऊदला सहकार्य केलं… – फडणवीसांचा निशाणा
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना नवाब मलिक प्रकरणावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. “महाराष्ट्रच नव्हे, देशाच्या इतिहासात जे घडलं नाही, ते महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. बॉम्बस्फोटाचे आरोपी, दाऊद इब्राहिमचे सहकारी यांच्यासोबत थेट व्यवहार करून आर्थिक गैरव्यवहार करण्याच्या आरोपाखाली राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर आख्खं राज्य सरकार त्यांच्या पाठिशी उभं राहिलं आहे. दाऊद इब्राहिमला सहकार्य केलं, मुंबईच्या खुन्यांशी ज्यांनी व्यवहार केला, त्यांना वाचवायला आख्खं सरकार उभं राहिलं आहे. पोलीस कोठडीत गेल्यानंतर देखील मंत्रीपदावर ती व्यक्ती कायम आहे. एकप्रकारे हा राज्यघटनेचा अवमान सरकार करतंय”, असं फडणवीस म्हणाले.