Uddhav Thackeray Sabha Live : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यात गेल्या महिन्याभरात घेतलेल्या तीन सभांच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या उद्धव ठाकरेंच्या सभेची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागून राहिली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून पहिल्यांदाच अशा प्रकारे जाहीर सभा घेत असल्यामुळे या सभेत ते काय बोलणार? याविषयी मोठी चर्चा सुरू झाली होती. या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस, भाजपा, हिंदुत्व, राज ठाकरे, किरीट सोमय्या, केतकी चितळे अशा अनेक विषयांवर सडेतोड भूमिका मांडली.
तुम्ही खोट्या मार्गाने आमच्या मागे लागाल, तर हा महाराष्ट्र असा पेटेल, की पळता भुई थोडी होईल. ही षंढाची औलाद जर तुम्ही आमच्या मागे एजन्सी आमच्या मागे लावणार असाल आणि त्यांच्या पाठून तुम्ही शिखंडी म्हणून बोलणार असाल, तर महाराष्ट्र मेल्या आईचं दूध प्यायलेला नाही. तुम्हाला दयामाया दाखवणार नाही. लढायचं असेल, तर सरळ या. आम्ही आहोत, तुम्ही आहात. ही जनता सगळं ठरवेल. पण आता हे राजकारण बंद करा. आमचं हिंदुत्व घर पेटवणारं नाही, घरातली चूल पेटवणारं असायला हवं. - उद्धव ठाकरे
बोबड्यांकडे लक्ष देऊ नका. याला क्रिकेटमध्ये स्लेजिंग म्हणतात. काम करण्याचं यांच्यात कर्तृत्व नाही. आपण करत असलेलं काम त्यांना पचत नाही. - उद्धव ठाकरे
मुंबई स्वतंत्र तुमच्या कित्येक जन्मात होणार नाही. पण बोंबलायचंच असेल, तर कांजूरची जागा अडवलीये, तिथे जाऊन बोंबला. असे कित्येक प्रकल्प राज्याचे आणि मुंबईचे केंद्रानं अडवून ठेवले आहेत - उद्धव ठाकरे
तत्व नसलेली खाती एकदा पुरा. तर ती पुरातत्व खाती होतील. - उद्धव ठाकरे
मला एका शिवसैनिकानं विचारलं तुम्ही लगे रहो मुन्नाभाई पाहिलात का? म्हटलं संबंध काय? म्हणे त्याच्यात संजय दत्तला गांधीजी दिसतात, मग हा गांधीगिरी करायला लागतो. तशी एक केस आहे आपल्याकडे. म्हटलं कोणती? म्हणे ती नाही का, ज्याला स्वत: ला बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं. शाल घेऊन फिरतात हल्ली. कधी मराठीच्या नादाला लागतात. कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात. म्हटलं त्यातला मुन्नाभाई लोकांचं भलं तरी करतो. हा कुठला मुन्नाभाई काढला. म्हणे तुम्ही चित्रपटाचा शेवट नाही बघितला की संजय दत्तला कळतं की आपल्या भेज्यात केमिकल लोच्या झालाय. ही केमिकल लोच्याची केस आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. असे मुन्नाभाई फिरतायत, फिरू द्या. आता कुणाला अयोध्येला जायचंय, जाऊ द्या. आदित्य पुन्हा चाललाय. - उद्धव ठाकरे
सत्ता मिळत नाही म्हणून तुमचं एकतर्फी प्रेम चाललंय. मग वाटतं, हे कोणत्या दिशेने चाललेत? एकतर्फी प्रेमात प्रेयसीला विद्रूप करण्याचे प्रकार घडतात. तसं यांचं एकतर्फी प्रेम आहे आणि हे महाराष्ट्राला विद्रूप करण्याचा प्रयत्न करत आहेत - उद्धव ठाकरे
घशावची खाज खाजवायची कशी म्हणून हे बोलून घेतात. पण आम्ही संयम बाळगतो म्हणजे आम्ही नामर्दाची औलाद नाही. एक तर आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही, पण अंगावर आलं तर सोडत नाही हे आमचं हिंदुत्व आहे - उद्धव ठाकरे
राजकारण राजकारणाच्या जागी ठेवा ना. सॉसचा फोटो आल्यानंतर दिल्लीतून पत्र आलं की याला केंद्राची सुरक्षा असताना याच्यावर हल्ला झालाच कसा? सुरक्षा तुम्ही दिली होती ना? मग आम्हाला काय विचारताय? सॉसची बाटली दिली कुणी त्यांना? - उद्धव ठाकरे
आताही करा, गो महागाई गो.. गो बेकारी गो - उद्धव ठाकरे
अशी चित्र-विचित्र भानगडी करणारी माणसं बघितल्यानंतर हे स्वत:ला हनुमान पुत्र म्हणवू तरी कसे शकतात. ज्या हनुमानाने पेटत्या शेपटीने लंका जाळली होती, तुम्ही बाबरी पाडल्यानंतर शेपट्या आत घालून बसला होतात. तुमची वितभर नाही, कित्येक मैल पळापळ झाली होती. हनुमान पुत्र वगैरे शब्द तुमच्या तोंडी शोभत नाहीत. - उद्धव ठाकरे
जणूकाही महाराष्ट्रात भंगार राज्य चाललंय असं सुरू आहे. आता दाऊदच्या मागे चाललेत. दाऊद उद्या म्हणााला मी भाजपात येतो, तर उद्या मंत्री म्हणून त्यांच्यासोबत कधीही दिसू शकतो. कदाचित म्हणून त्याच्या मागे लागले असतील. बघ, ईडी वगैरे मागे लागतं. आमच्यासोबत ये, तुला मंत्री बनवतो. उद्या हे दाऊदलाही मंत्री बनवतील आणि सांगतील दाऊद आमचा गुणाचा पुतळा आहे. - उद्धव ठाकरे
शरद पवारांवर एका बाईने विचित्र कॉमेंट केली. घरी आई-वडील कुणी आहे का? संस्कार काही होतात की नाही? काहीही झालं, तरी बाई तुझा संबंध काय? कुणाबद्दल बोलतेयस. काय बोलतेयस. जर हे तुझं वक्तव्य असेल, तर तुझी मुलं उद्या काय होणार? हा सुसंस्कृतपणा आपल्या महाराष्ट्रातून, देशातून जात चाललाय - उद्धव ठाकरे
आम्ही हिंदू आहोत की नाही, हे ठरवणारे तुम्ही नाहीत. तुमचं विकृत हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाचा विचार दिला, तुम्ही हिंदुत्वाचा विकार करताय - उद्धव ठाकरे
गेल्या वेळी त्यांनी भगव्या टोप्या घातल्या होत्या. भगव्या टोप्या कशाला? हिंदुत्व डोक्यात असतं. डोक्यातल्या मेंदूत असतं. टोपीवर हिंदुत्व नसतं. भगवी टोपी घालून तुम्ही हिंदुत्व दाखवत असाल, तर आरएसएसची टोपी काळी का? - उद्धव ठाकरे
उद्या ते उत्तर सभा घेणार आहेत. घ्या. मग आम्ही परवा घेतो. तुम्ही त्याच्यानंतर घ्या. हेच चाळे चालू ठेवायचेत का? उत्तरं द्यायची असतील, तर महागाईने होरपळलेल्या जनतेला उत्तर द्या - उद्धव ठाकरे
मग तेव्हा बोंबललात का नाही भोंगा तेव्हा होता ना की मी होतो मी होतो मी होतो. पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन. येण्याची शाश्वती नव्हती, गेल्याची पण होती की नाही माहिती नाही - उद्धव ठाकरे
आडवाणींच्या मुलाखतीचा व्हिडीओ आहे. त्यांनी सांगितलं जी लोकं चढली होती, ती मराठी बोलत होती. मग मी प्रमोद महाजनांना सांगितंल की त्यांच्याशी बोल. पण त्यांचंही ते ऐकत नव्हते. अशी मराठी माणसं दुसरी कोण असतील? बाबरी पडली तेव्हा मी बाळासाहेबांना सांगितंल की साहेब बाबरी पाडली. ते म्हणाले काय सांगतो. बाबरी पाडली. तेवढ्यात फोन वाजला. त्यांनी उचलून विचारलं मग? जर शिवसेना कार्यकर्त्यांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, गर्व आहे. फोन ठेवल्यावर मला म्हणाले ही कसली याची औलाद. जे लोकांना कारसेवा करायला बोलवत आहे. हे असलं पुचाट नेतृत्व आहे. नेतृत्वाचं लक्षण हेच असतं. जो नेता लोकांना भडकवून त्याने सांगितलेलं काम केल्यावर जबाबदारी झटकतो, तो नेता असूच शकत नाही. हेच काम भाजपानं केलंय. सुंदरसिंग भंडारी तेव्हा हेच म्हणाले होते. - उद्धव ठाकरे
ते म्हणतात बाबरीच्या वेळी शिवसेना कार्यकर्ते नव्हतेच. मी गेलो होतो. तुमचं वय काय होतं तेव्हा? तेव्हा शाळेची सहल गेली होती का तिथे? तुमचं वय काय, बोलता किती. तुम्ही काय केलंय हिंदुत्वासाठी हे आता जनतेला कळून जाऊ द्या. तुम्ही काय केलंय हिंदुत्वासाठी. बाबरी तर पाडली नाहीच. तुम्ही नुसतं बाबरीवर चढायचा प्रयत्न जरी केला असता, तरी बाबरी खाली आली असती. लोकांना श्रमच करायला लागले नसते. तुम्ही एक पाय टाकला असता तरी बाबरी खाली आली असती. आता हे म्हणतायत ती मशीद नव्हती. तो ढांचा होता. मग तेव्हा एवढं टिपेला का सांगितलं मंदीर पाडून मशीद बांधली? - उद्धव ठाकरे
भाजपानं मुफ्ती मोहम्मद सैद यांच्याशी सरकार स्थापनकेलं होतं. ते भारत माता की जय म्हणतात का? की तुमच्या कानात वंदे मातरम बोलतात? म्हणे तिकडे आम्हाला आव्हान दिलं होतं की निवडणुका कशा होतात हे बघतो. म्हणून निवडणुका घेऊन दाखवल्या. नंतर सरकार स्थापन करून दाखवलं. पण मुफ्ती मोहम्मदसोबत तुमचा मंत्री पत्रकार परिषदेत होता. तो म्हणाला काश्मीरमधल्या निवडणुका शांततेत पार पाडू दिल्या म्हणून मी पाकिस्तान, हुर्रीयत आणि दहशतवाद्यांना धन्यवाद देतो. मग नेमकं तुम्ही कुणाला काय दाखवलंत? - उद्धव ठाकरे
तुम्ही एनडीएत किती पक्ष जमवले होते? एनडीएक ३०-३५ लोक होते. नितीन गडकरींना विचारलं ही लोकं कोण? ते म्हणाले एनडीएतले सहकारी. काहीकाहींचा एकही खासदार नव्हता. नितीश कुमारांना संघमुक्त भारत करायचा होता. त्यांना तुम्ही मांडीवर घेऊन बसताय का? गेल्या आठवड्यात ते म्हणाले हे भोंगा वगैरे सगळं बकवास आहे. घातलं तुमच्या भोंग्यात त्यांनी पाणी. हिंमत आहे का तुमची नितीश कुमारांसमोर बोलायची. ते म्हणाले हे चाळे मी नाही करणार इकडे. ज्याची त्याची पूजा ज्यानं त्यानं करायची - उद्धव ठाकरे
काँग्रेससोबतर असलो, तरी ह्रदयातलं हिंदुत्व सोडलेलं नाही. मी विधानसभेत बोललोय. सत्ता असो वा नसो, परवा नाही. आमचं हिंदुत्व तकलादू नाही, ते खरं आहे. हिंदुत्व सोडायला काय धोतर वाटलं का, कधी नेसलं, कधी सोडलं. सोडायला लाज तुम्हाला नसेल वाटत, पण हिंदुत्व नेसण्याची, सोडण्याची गोष्ट नाही. आम्ही काँग्रेससोबत गेलो ते उघड गेलो. तुमच्यासारखं सकाळचा शपथविधी नाही केला आम्ही. तुम्ही केलं तर पवित्र आणि आम्ही केलं तर अपवित्र. आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो तर दगा, तुम्ही सकाळची शपथ घेतली ते काय केलं. तो तुमचा प्रयत्न यशस्वी झाला असता तर नवाब मलिक, अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून गुणगान केलं असतं असं वाटतं का तुम्हाला? - उद्धव ठाकरे
यांना झेडप्लस सुरक्षा. टिनपाटांना सुरक्षा देत आहेत. तिथे काश्मिरी पंडितांना सुरक्षा नाही, पण इथे भोकं पडलेल्या टिनपाटांना केंद्राची सुरक्षा देत आहेत. कुणाला वाय प्लस, कुणाला झेड प्लस. काय बापाचा माल आहे तुमच्या? लोकांचा पैसा आहे तो. ज्यांना सुरक्षा द्यायला पाहिजे, त्यांना देत नाही. ही असली गळकी टिनपाटं काय उपयोगाची तुम्हाला. टिनपाट सभ्य शब्द बोललो, टमरेलच बोलायचं होतं - उद्धव ठाकरे
संभाजीनगरमध्ये ओवेसी गेला आणि औरंगजेबाच्या थडग्यावर डोकं टेकवून आला. यांची ए टीम, बी टीम, सी टीम काम करतेय. कुणालातरी औरंगजेबाच्या थडग्यावर पाठवायचं, कुणाच्यातरी हातात भोंगा द्यायचा, कुणाच्या हातात हनुमान चालीसा द्यायची आणि मजा घेत बसायचं. म्हणजे काय कारवाई झाली की त्यांच्यावर होणार आणि आम्ही बोंबलायला मोकळे. मग आम्ही जाणार आणि टोमॅटो सॉस लावून पत्रकार परिषद घेणार. हे तुमचं शौर्य. - उद्धव ठाकरे
कश्मिरी पंडित म्हणतात आमचा बळीचा बकरा केला जातोय. हे काश्मिरी फाईल्सचं पुढचं पान आहे का? - उद्धव ठाकरे
राहुल भटची हत्या झाली, त्या कार्यालयासमोर हनुमान चालीसा पढायचा की घंटा वाजवायचा? - उद्धव ठाकरे
आपण खोटं बोलू शकत नाही. खोटं बोलणं त्यांच्या हिंदुत्वात बसतं, आपल्या हिंदुत्वात बसत नाही, हा दोघांच्या हिंदुत्वात फरक आहे - उद्धव ठाकरे
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत यांचं चिंतन, कुंथन सगळं चालतं. कधी चिंतन, कधी कुंथत बसतात. प्रमोद महाजन होते, तेव्हा तिथे जावंसं वाटायचं. आता प्रश्न पडतो, की त्या प्रबोधिनीत हे तुम्ही शिकवता का? या प्रबोधिनीत जे शिकले, ते कुठे गेले आता? - उद्धव ठाकरे
काँग्रेसच्या काळात ७ पैशांनी पेट्रोलचे दर वाढल्यामुळे भाजपानं संसदेवर मोर्चा काढला होता. त्यात अटल बिहारी वाजपेयी बैलगाडीने गेले होते. भाजपाचा तो संवेदनशीलपणा कुठे गेला? ही जर बाळासाहेबांची शिवसेना नसेल, तर तुमचा भाजपातरी अटलजींचा राहिलाय का? - उद्धव ठाकरे
अनेक गोष्टी सांगायलाच हव्या. मी मागे बोललो होतो की आमची २५ वर्ष युतीत सडली. हो सडलीच. हा मित्र नाही, शत्रू आहे. पण हिंदुत्वाचा बुरखा फाटल्यानंतर त्याचं भेसूर रुप दिसत आहे. अजून आमचा विश्वास बसत नाही की हाच का तो आपला मित्र? किती भयानक आणि वाईट पद्धतीने अंगावर येतायत. आम्हाला म्हणतात तुमच्या सामनात काय येतं. आमच्या सामनात जे येतं, ते हिंदुत्वाच्या हिताचं असतं. ते येणारच. मला कुणीही सामनामधला एक लेख काढून दाखवावा ज्या भाषेत यांच्या लांडग्यांची पिलावळ आपल्या अंगावर येते. अशा भाषेत आम्ही मोदींचा अपमान केलाय का? - उद्धव ठाकरे
तुम्हाला मुंबई फक्त ओरबाडण्यासाठी पाहिजे. ज्या ज्या वेळा मुंबईवर आपत्ती येते, तेव्हा शिवसेना कार्यकर्ते पहिल्यांदा धावून जातात. कोणतीही आपत्ती येऊ द्या. तो इतरांना मदत करत असतो. रक्तदान करण्यासाठीही अंगात मर्दाचं रक्त असावं लागतं. ते शिवसेनेत आहे. - उद्धव ठाकरे