मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या निमित्ताने आज औरंगाबादमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील या कार्यक्रमांना उपस्थित आहेत. आज औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका विधानावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. भविष्यात शिवसेना आणि भाजपा एकत्र येणार असल्याची चर्चा यावरून सुरू झाली आहे. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार रावसाहेब दानवे आणि केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड हे देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच केलेल्या विधानामुळे तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांचा रोख दानवे, कराडांच्या दिशेने?

मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरुवात करताना व्यासपीठावरच्या उपस्थित मान्यवरांना संबोधताना आजी-माजी सहकाऱ्यांचा उल्लेख केला. मात्र, यावेळी मागे बघून त्यांनी भावी सहकारी म्हणून देखील संदर्भ दिला. त्यामुळे नेमका मुख्यमंत्र्यांचा रोख कुणाकडे आहे? याविषयी चर्चा सुरू झाली. “व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी”, असा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. त्यामुळे त्यावरून वेगवेगळे तर्क काढले जात आहेत.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना मागे वळून व्यासपीठावर बसलेल्या व्यक्तींकडे पाहिलं. यावेळी व्यासपीठावर रावसाहेब दानवे आणि भागवत कराड हे देखील उपस्थित होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना या विधानामधून शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येण्याचेच तर संकेत द्यायचे नव्हते ना? याविषयी मोठी चर्चा सुरू झाली आहे.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन : औरंगाबादमध्ये संतपीठ स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा!

..तर निजाम आणि आपल्यात काय फरक?

“व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो, मातांनो… आजचं हे व्यासपीठ आणि कार्यक्रम पाहून मला समाझान आहे की आपण सगळेच जण राजकारण बाजूला ठेऊन जनतेच्या हिताच्या गोष्टी आपण करत आहोत. नाहीतर मराठवाडा मुक्तीदिन साजरा करायचा आणि आपापसात भांडण करायचं. मग निजामाला कशाला घालवलं? नालायकपणे कारभार करून आपणही तसेच वागत राहिलो, तर त्या आणि या राजवटीमध्ये काय फरक राहिला? अपेक्षा एकमेकांकडून असणारच आहेत”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “मला माजी मंत्री म्हणू नका”

दरम्यान, गुरुवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका विधानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या या विधानाचा अर्थ लावला जात आहे. पुण्यात एका खासगी दुकानाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला माजी मंत्री न म्हणण्याचा उल्लेख केला होता. “मला माजी मंत्री म्हणू नका. दोन-तीन दिवसांत कळेल तुम्हाला“, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यामुळे आधी चंद्रकांत पाटील यांचं विधान आणि त्यापाठोपाठ आज मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावरून राजकीय वर्तुळात शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येण्याच्या शक्याशक्यतेवर चर्चा सुरू झाली आहे.

प्रविण दरेकर म्हणतात, “हा काँग्रेस-राष्ट्रवादीला इशारा असावा”

“या विधानावरून तर्क करणं योग्य नाही. काल चंद्रकांत पाटलांनी जे वक्तव्य केलं, त्यावर उद्धव ठाकरेंनी केलेली ही मिश्किल टिप्पणी आहे. त्यातून आलेलं हे विधान मला वाटतंय. ते जरी गांभीर्याने घ्यायचं झालं, तर उद्या भाजपासोबत जायचं झालं, तर माझी तयारी आहे, असं त्यांना म्हणायचं असावं. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कुरघोड्यांचं राजकारण करू नये, मला भाजपासोबत जाण्याचा पर्याय खुला आहे, हा संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न असावा”, अशी प्रतिक्रिया विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे.

Story img Loader