राज्यात करोनाच्या संख्या दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. या संख्येची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. कोरोनाच्या या वाढत्या रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी ६ वाजता कोविड टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोरोना रुग्णसंख्या वाढली तर मास्क बंधनकारक करणार असल्याचे विधान केले होते.

करोना परिस्थितीचा आढावा

कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करोना परिस्थितीचा आढावा घेणार आहे. गेल्या काही महिन्यात राज्यात करोना रुग्णसंख्येत घट झाली होती. त्यानंतर राज्यसरकारने राज्यातील निर्बंध शिथील केले होते. मात्र, आता पुन्हा करोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही तातडीची बैठक बोलावली आहे.

करोना रुग्णसंख्येत वाढ

गेल्या २४ तासात राज्यात १ हजारापेक्षा अधिक करोना रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासात एकाही करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. मात्र, वाढत्या रुग्णसंख्येनंतर आता राज्यातील निर्बंध शिथिलच राहतील की आणखी कडक होतील याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.