गेल्या काही दिवसाांपासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा मोठा तडाखा बसला. यानंतर स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणवार जीवित आणि वित्तहानी देखील झाली. कोल्हापुरात २०१९नंतर पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे हजारो नागरिकांचे संसार पाण्यात वाहून गेले. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी या परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा सूचक इशारा दिला आहे. कोल्हापूरमध्ये पूरस्थिती निर्माण होण्यामधल्या अनेक महत्त्वाच्या कारणांपैकी नदीपात्रातील अतिक्रमण हे देखील महत्त्वाचं कारण सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बोलत होते.
..तोपर्यंत हे संकट पाठ सोडणार नाही!
“काही कठोर निर्णय आपल्याला घ्यावे लागतील. ते नाही घेतले, तर हे संकट आपली पाठ सोडणार नाही. जे काही करता येणं शक्य आहे, ते आपण करू शकतो. आत्ताच ते शक्य आहे. नदी पात्रात झालेली अतिक्रमणांबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, की यापुढे आता बांधकामं करता येणार नाही. नाहीतर ब्लू लाईन, रेड लाईन या रेषा मारूच नका. मग जे व्हायचं, ते होऊ द्या. पण असं आपल्याला करता येणार नाही. त्यावर कायमस्वरूपी इलाज करणं हा महत्त्वाचा भाग आहे”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
आणखी वाचा- ‘पूरपरिस्थिती टाळण्यासाठी संरक्षक भिंत’; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका
कायमस्वरूपी तोडगा हवा
“लोकांच्या अपेक्षा आहेत की हे दरवर्षी व्हायला लागलं आहे. आता यावर कायमस्वरूपी तोडगा काढायला हवा. तोडगा काढायचा असेल, तर येणाऱ्या अतिरिक्त पाण्याचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे. त्याचा आराखडा बनवून काम सुरू करावं लागेल. कोसळणाऱ्या दरडी, खचणारे रस्ते यांचाही अभ्यास करावा लागेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातत्याने पूरबाधित भागातील नागरिकांचं पुनर्वसन करणं ही बाब आहे. दरड कोसळण्याची शक्यता आहे, अशा गावांचंही पुनर्वसन करावं लागणार आहे”, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं.
“मी पॅकेज घोषित करणारा नाही, तर मदत करणारा मुख्यमंत्री”- उद्धव ठाकरे<a href="https://t.co/3O7BfdWJOc" rel="nofollow">https://t.co/3O7BfdWJOc < येथे वाचा सविस्तर वृत्त #Maharashtra #MaharashtraFlood #CMUddhavThackeray @OfficeofUT @ShivSena @ShivsenaComms pic.twitter.com/IDLwmdsRiL
— LoksattaLive (@LoksattaLive) July 30, 2021
यावेळी कोसळलेलं संकट भयानक
“मी येऊन या पुराचं भीषण वास्तव बघितलं आहे. या कामाला गती दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. यावेळी कोसळलेलं संकट फार भयानक आहे, काही ठिकाणी दरडींखाली आपलेच माता-भगिनी गाडले गेले आहेत. हे सगळं अकरित घडायला लागलं आहे. या संकटातून बाहेर पडताना जीव वाचवणं ही आपली प्राथमिकता असते. त्यासोबतच कोविड पसरू नये आणि पाणी साचल्यानंतर येऊ शकणारे रोग येऊ नये यासाठी प्रयत्न करणे, मलबा साफसफाई करणं, तिथल्या लोकांना उभं करणं हे सगळं असतं. पण आता हे वारंवार व्हायला लागलं आहे”, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चिंता व्यक्त केली आहे.