Amruta Fadnavis New Song : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं आता आणखी एक नवं गाणं येणार आहे. त्यांनीच या संदर्भात सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत माहिती दिली. संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्ताने हे गाणं लॉन्च होणार असल्याचं त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे सांगितले.

अमृता फडणवीस या गायक आहेत. विविध मंचावरून त्यांनी त्यांच्या कलेची झलक दाखवली आहे. तसंच, विविध अल्बममधूनही त्यांनी त्यांचा आवाज रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आहे. आता त्या पुन्हा एकदा नव्या गाण्याच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. “मी पुन्हा येत आहे”, असं म्हणत त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

अमृता फडणवीसांनी केलं आवाहन

“जेव्हा कोणीही बंजारा समाज किंवा त्यांच्या संस्कृतीची चर्चा करतं तेव्हा मला खूप आनंद होतो. नुकतंच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंजारा समाजाच्या सामाजिक योगदान आणि वारशाबाबत चर्चा केली. मी माझा विश्वास आहे की बंजारा समाज आणि त्यांच्या संस्कृतीचा आपण आदर केला पाहिजे. त्यांची संस्कृती आणि प्रथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त मी एक गाणं आणतंय. ते जरूर ऐका आणि पाहा”, असं आवाहन अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियाद्वारे केलं आहे.

१५ फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराजांची जयंती आहे. त्यानिमित्ताने हे गाणं लॉन्च होणार आहे. त्यामुळे त्यांचं हे नवं कोरं गाणं ऐकण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.

Story img Loader