मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जपान दौरा नगर जिल्हय़ाला लाभदायक ठरण्याची चिन्हे आहेत. सुपे (ता. पारनेर) एमआयडीसीत गुंतवणुकीबाबतचा करार झाला आहे. फडणवीस यांनीच ट्विटरवर ही माहिती दिली आहे.
जपानमधील ‘जेट्रो’ व महाराष्ट्राच्या मंत्री पातळीवर गटात या गुंतवणुकीविषयी सहकार्य करार झाला आहे. जपानचे वाहतूक व पायाभूत सुविधामंत्री आकिहारो ओटा यांच्याशी याबाबत फडणवीस यांची चर्चा झाली. जपानमधील तीन ते चार उद्योजकांनी याआधीच सुपे औद्योगिक वसाहतीत उद्योग सुरू करण्याबाबत उत्सुकता दर्शवली होती. या प्रस्तावांवर फडणवीस यांच्या या जपान दौऱ्यात शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. सुपे औद्योगिक वसाहतीचा अलीकडेच विस्तार करण्यात आला असून, त्यासाठी नव्याने भूसंपादनही करण्यात आले आहे. त्यामुळे या उद्योगांना येथे पुरेशी जागा आता उपलब्ध आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई-पुणे-नागपूर अशा बुलेट ट्रेनबाबतही फडणवीस यांच्या जपान दौऱ्यात चर्चा झाल्याचे समजते. याबाबतही सहकार्य करार झाल्यास या बुलेट ट्रेनचाही नगरला लाभ होऊ शकेल.