CNG-PNG Price Hike Today, 13 April 2022 : मुंबईकरांच्या खिश्याला कात्री बसणार आहे. मुंबईकरांवरील महागाईचा मारा थांबण्याचं नाव घेत नाही आहे. महानगर गॅस लिमिटेड (MGL)ने एका आठवड्यात दुसऱ्यांदा सीएनजी-पीएनजीचे दर वाढवले आहेत. त्यामुळे वाहन चालविण्याबरोबरच स्वयंपाकघरावरील महागाईचा भार वाढला आहे.
एमजीएलने मंगळवारी रात्री सीएनजीच्या किमतीत ५ रुपयांनी वाढ केली आहे. आता मुंबईत सीएनजीचा दर ७२ रुपये किलोवर पोहोचला आहे. याआधी ५ एप्रिललाही सीएनजीच्या दरात किलोमागे ७ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यापूर्वी १ एप्रिल रोजी महाराष्ट्र सरकारने व्हॅटमध्ये १० टक्के कपात केली होती, तेव्हा एमजीएलने सीएनजीच्या दरात प्रति किलो ६ रुपयांची कपात केली होती. मात्र, केवळ दोन आठवड्यांत त्याची भरपाई करत सीएनजीच्या दरात १२ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
महानगर गॅस लिमिटेडने घरांमध्ये स्वयंपाकाचा गॅस म्हणून वापरल्या जाणार्या पाइप्ड नॅचरल गॅसच्या (पीएनजी) दरातही आठवड्यात दुसऱ्यांदा वाढ केली आहे. पीएनजीच्या किमतीत मंगळवारी रात्री ४.५ रुपये प्रति स्टँडर्ड क्युबिक मीटरने (एससीएम) वाढ करण्यात आली आहे. कंपनीने ५ एप्रिल रोजी पीएनजीच्या दरात प्रति एससीएम ५ रुपयांनी वाढ केली होती. अशाप्रकारे अवघ्या एका आठवड्यात पीएनजी ९.५ रुपयांनी महागला आहे. यापूर्वी १ एप्रिल रोजी सरकारने व्हॅटमध्ये कपात केल्यानंतर एमजीएलने पीएनजीची किंमत ३.५० रुपयांनी कमी केली होती.
Gold-Silver Price Today : सोन्या-चांदीच्या भावात आज पुन्हा तेजी; जाणून घ्या किती रुपयांनी वाढले दर
मुंबईला लागून असलेल्या पुणे शहरातही मंगळवारी रात्रीपासून सीएनजीच्या दरात किलोमागे पाच रुपयांनी वाढ झाली आहे. शहरात आजपासून सीएनजीचा दर ७३ रुपये किलोवर पोहोचला आहे. अखिल भारतीय पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे म्हणणे आहे की सीएनजी मिश्रित गॅसच्या किंमती जागतिक बाजारात प्रचंड वाढल्या आहेत. त्याची भरपाई करण्यासाठी, आम्हाला किरकोळ किंमती देखील वाढवाव्या लागतील.
मुंबईतील टॅक्सी युनियनचे सरचिटणीस सांगतात की, सीएनजीच्या वाढत्या किमती पाहता आम्ही सरकारला मदतीचे आवाहन केले आहे. ते म्हणतात की, सरकारने एकतर सीएनजीच्या किमतीत सबसिडी द्यावी किंवा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळण्यासाठी पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. सरचिटणीस म्हणाले की, लवकरच सीएनजीचे दरही १०० रुपयांच्या पुढे जाणार असून टॅक्सी, ऑटो चालकांना त्यांचा खर्च भागवणे कठीण होणार आहे. आम्ही भाडेवाढीची मागणी करत आहोत, पण त्याचा फटका सर्वसामान्यांनाही बसणार आहे.