रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित शेतजमिनीच्या भरपाईच्या प्रश्नावर सांगली जिल्ह्य़ातील शेकडो शेतकऱ्यांनी किसान सभेच्या झेंडय़ाखाली सोलापुरात येऊन सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून सौम्य लाठीमार केल्यामुळे प्रकरण चिघळले आणि संतप्त झालेल्या आंदोलक शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत ठिय्या आंदोलन कायम ठेवले होते. अखेर सहकारमंत्री देशमुख यांनी बुलढाणा येथून आंदोलक शेतकऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून येत्या २४ ऑक्टोबर रोजी मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसह संबंधित सहा मंत्र्यांबरोबर बैठक बोलावून शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सायंकाळी पाच तास चाललेले आंदोलन मागे घेण्यात आले.
सहकारमंत्री देशमुख यांच्या होटगी रस्त्यावरील बंगल्यासमोर झालेल्या ठिय्या आंदोलनाच्यावेळी पोलिसानी हस्तक्षेप करून लाठीमार केल्याने त्यात अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्यासह डॉ. सुदर्शन घेरडे, विजय पवार व इतर शेतकरी कार्यकर्ते जखमी झाल्याचा आरोप किसान सभेने केला आहे. या लाठीमाराचा संघटनेने तीव्र शब्दांत निषेध नोंदविला आहे.
नव्याने उभारण्यात येणाऱ्या रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी शासनाने एक दमडीही न देता सांगली व सोलापूर जिल्ह्य़ातील असंख्य शेतकऱ्यांच्या शेतजमिनी संपादित करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. या जमिनींवर राष्ट्रीय महामार्गाचे कामही सुरू झाले आहे. त्याविरोधात दोन्ही जिल्ह्य़ांतील शेकडो बाधित शेतकऱ्यांनी सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांना भेटण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून सांगलीमधून आपला मोर्चा सुरू केला आणि १८० किलोमीटर अंतर कापून शनिवारी सोलापुरात हा मोर्चा दाखल झाला. शेतकरी आंदोलकांनी तीन दिवसांपूर्वी सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांना मागण्यांचे निवेदन पाठविले होते आणि शनिवारी सोलापुरात त्यांच्याशी चर्चेसाठी वेळही मागितली होती. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही ही बाब कळविण्यात आली होती. परंतु देशमुख हे भेटीची वेळ न देता बुलढाण्याच्या दौऱ्यावर गेले. त्यामुळे शेतकरी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांच्या बंगल्याकडे मोर्चा वळविला. तत्पूर्वी, विजापूर रस्त्यावर पत्रकार भवन चौकात या शेतकऱ्यांच्या मोर्चाने अचानकपणे तेथील वाहतूक रोखली. त्यामुळे पोलीस यंत्रणा गडबडली. सहकारमंत्री देशमुख यांच्या बंगल्याकडे आंदोलकांनी कूच केल्यानंतर तेथे पोलिसांनी हस्तक्षेप करीत शेतकरी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वाद होऊन पोलिसांनी आंदोलकांना हुसकावून लावण्यासाठी सौम्य लाठीमार केला. तेव्हा वातावरण आणखी चिघळले. आंदोलकांनी आणखी आक्रमक पवित्रा घेत देशमुख यांच्या बंगल्यासमोर मारलेला ठिय्या मागे न घेण्याचा निर्धार केला. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले, कोशाध्यक्ष उमेश देशमुख, सिटूचे राज्य सचिव एम. एच. शेख, किसान सभेचे उपाध्यक्ष सिध्दप्पा कलशेट्टी, माणिक अवघडे, दिगंबर कांबळे, डॉ. सुदर्शन घेरडे, नामदेव करगणे, अनिल वासम आदींनी केले.