कोळसा खाण प्रकरणासह इतर गैरव्यवहारांमधील संशयित असणारे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मंत्रीपदाचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली. गुन्हे दाखल झालेल्या मंत्र्यांचे राजीनामे घेण्याऐवजी शासन त्यांना पाठिशी घालण्याचे काम करीत असल्याची तोफही त्यांनी डागली तर गैरव्यवहारांबाबत मंत्र्यांवर कारवाई करावी, याकरिता भाजप रस्त्यावर उतरणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. भाजपची उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक शुक्रवारी  सुधीर मुनगंटीवार, सरचिटणीस रघुनाथ कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी पत्रकारांशी बोलताना खडसे यांनी कोळसा खाणीच्या वाटपावरून दाखल झालेले गुन्हे आणि इतर प्रकरणांत भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप केला. प्रदेशाध्यक्ष मुनगंटीवार यांनी याच मुद्यावर राज्य शासनावर टिकास्त्र सोडले. सध्या एका पाठोपाठ एक घोटाळे बाहेर येत असून संपूर्ण मंत्रीमंडळ भ्रष्टाचारी वाटावे, अशी स्थिती आहे. ज्या ज्या मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत, त्यांनी राजीनामा द्यावेत, याकरिता भाजप लवकरच रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर संपूर्ण देशात रस्त्यावर ही लढाई भाजप लढणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी शासनाला सत्तेची मस्ती चढली आहे. त्यांची मस्ती आगामी निवडणुकीत उतरविली जाईल. जनताच त्यांना जोरदार झटका देईल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. दरम्यान, पक्ष सदस्य नोंदणीच्या थंडावलेल्या कामाला चालना देण्याचे काम या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आले. नाशिक महापालिका शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत अनेक जण नाराज झाले होते. त्यांची समजूतही नेत्यांनी काढली. विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर व नंदुरबार जिल्ह्याची जिल्हानिहाय बैठक घेऊन या अभियानास चालना देण्याचे आवाहन करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा