नांदेड: नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील अनागोंदी आणि बाह्य परिसरातील अस्वच्छतेवर ओरड होत असताना रुग्णालयाबाहेरील अस्वच्छता थेट नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागापर्यंत पोहोचली आहे. पेस्ट कंट्रोल करूनही तेथे झुरळ व किटकांचा मुक्त वावर असल्याची चित्रफितच बाहेर आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून पुन्हा नव्याने पेस्ट कंट्रोल करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे अधिष्ठातांनी रविवारी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरालगत असलेला विष्णपुरी येथे काही वर्षांपूर्वी (कै.) शंकरराव चव्हाण यांच्या नावाने  भव्य शासकीय रुग्णालय सुरू करण्यात आले. नांदेड जिल्ह्यासह लगतच्या परभणी, हिंगोली व विदर्भातील काही जिल्ह्यातून रुग्ण येथे उपचारासाठी येतात. शिवाय तेलंगणातील रुग्णांवरही येथे उपचार होतात. दीड वर्षापूर्वी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे २४ तासात २४ बालकांचे जीव गेले होते. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. रुग्णालय परिसरातील अस्वच्छता, औषधांचा तुटवडा याबाबत मोठी ओरड झाली होती. रुग्णालयाच्या आतील भागातील दुर्गंधी, स्वच्छता कामगारांचे उदासिन धोरण यावरून एका खासदाराने तत्कालीन अधिष्ठानांना सफाई करण्यास भाग पाडले होते. नंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले.

नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील अस्वच्छतेबाबत तत्कालीन आरोग्य मंत्र्यांनी कान उघाडणी केली. या घटनेनंतर काही दिवस स्वच्छतेच्या कामाला वेग आला होता. पण आता तेथील परिस्थिती गंभीर व चिंताजनक झाली आहे. रुग्णालय व परिसरातील अस्वच्छतेमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आता, ही अस्वच्छता थेट नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागापर्यंत पोहचली आहे.

वेगवेगळ्या गंभारी आजाराने त्रस्त असलेल्या लहान मुलांवर या अतिदक्षता विभागात उपचार केले जातात. तेथेच झुरळं, किटक यांचा मुक्त वावर आहे. स्वच्छतेच्या अभावामुळे संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. बालकांच्या मुखात किंवा श्वसन मार्गात ही अस्वच्छता गेली, तर त्याचे परिणाम वाईट होतात. या विभागात यापूर्वी पेस्ट कंट्रोल करण्यात आले होते. परंतु, तरीही किटकांचा वावर वाढल्याचे समोर आल्यानंतर प्रशासन ख़डबडून जागे झाले आहे. या प्रकरणाची चौकशी करून पुन्हा नव्याने पेस्ट कंट्रोल करण्याचे निर्देश दिल्याचे सांगण्यात आले.