विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागेल, म्हणून गेल्या काही दिवसांपासून चांगलीच लगबग सुरू होती. शुक्रवारी यास कमालीचा वेग आला होता. शक्य तेवढय़ा लवकर आपल्या कामावर सही व्हावी, असा काहींचा प्रयत्न होता. मात्र, दुसरीकडे राजकीय नेत्यांनी आचारसंहितापूर्वीची तयारी पूर्ण केली.
दरम्यान, औरंगाबाद शहरातील तीन मतदारसंघात मतदानादरम्यान िपट्ररही वापरले जाणार आहेत. केलेले मतदान मतदाराला स्क्रीनवर पाहता येणार आहे. त्यामुळे एका उमेदवारासमोरील बटन दाबले आणि मतदान दुसऱ्याच्या नावे नोंदविले गेले, असे मतदारांनाही म्हणता येणार नाही. या प्रिंटरचे प्रशिक्षण औरंगाबाद, नगर व नाशिक जिल्ह्य़ातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आले. निवडणूक आचारसंहिता लागल्याने लोकप्रतिनिधींची शासकीय वाहने काढून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदर्श आचारसंहितेच्या पालनासाठी आवश्यक त्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख जाहीर केल्याने उमेदवारांना मतदारसंघात फिरण्यासाठी केवळ ११ दिवस मिळतील.१५ ऑक्टोबरला राज्यात सर्वत्र एकाच दिवशी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचाराचा कालावधी तसा कमीच मिळणार आहे. जिल्ह्य़ात शिवसेना व काँग्रेसचे प्रत्येकी ३, राष्ट्रवादी काँग्रेस १, मनसे १ व अपक्ष १ असे राजकीय बलाबल आहे. कन्नडचे मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी नेतृत्वावर टीका करीत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सेनेची ताकद वाढल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे आता जिल्ह्य़ात शिवसेनेचे ४ आमदार झाले. गंगापूरचे अपक्ष आमदार प्रशांत बंब यांनाही शिवसेनेत प्रवेश घ्यावयाचा होता. मात्र, अजून हा प्रवेश झाला नाही. त्यामुळे त्यांचा पक्ष कोणता, हे अजूनही ठरले नाही. इच्छुकांनी मात्र निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. या विधानसभेच्या निवडणुकीत एमआयएम हा पक्षही उतरेल, असे सांगितले जात आहे. निवडणुकीतील मतदारांची आकडेमोड नव्याने सुरू झाली आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी बहुतांश पक्षांचे नेते मुंबईतच आहेत.