काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात अलीकडेच ईडीने नोटीस जारी केली आहे. २०१५ साली सबळ पुरावे न आढळल्याने हे प्रकरण बंद करण्यात आलं होतं. पण आता पुन्हा नव्याने ईडीने हे प्रकरण उकरून काढत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. त्यामुळे देशातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना बजावण्यात आलेल्या ईडी समन्सवरुन ईडीला मोठा इशारा दिला आहे.
राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना हात जरी लावला तर देशातील आणि महाराष्ट्रातील सर्व तुरुंग भरवून दाखवू, अशा शब्दांत पटोले यांनी ईडीला धमकीवजा इशारा दिला आहे. ते भंडाऱ्यातील एका जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपावर कडाडून टीका केली आहे.
यावेळी बोलताना पटोले म्हणाले की, “नॅशनल हेराल्ड प्रकरणात कोणतेच सबळ पुरावे न मिळाल्याने तपास यंत्रणांनी २०१५ मध्ये हे प्रकरण बंद केलं होतं. आता काँग्रेस पक्षाने देशभर नवसंकल्पाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार देशात १ आणि २ तारखेला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर गांधी परिवाराला लक्ष्य केलं जात आहे. आमच्या नेत्यांना हात लावून दाखवा, जितके तुरुंग भरायचे आहेत, तितके देशातील, महाराष्ट्रातील तुरुंग भरवून दाखवू, याची सुरुवात महाराष्ट्रातून होईल,” असा धमकीवजा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.
त्यांनी पुढे म्हटलं की, “सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने पाठवलेलं नोटीस समाज माध्यमावर व्हायरल झालं होतं. ते नोटीस पाहिलं तर लक्षात येईल, संबंधित नोटीसवर ईडीचं कोणतही कलम नव्हतं. केंद्रातील भाजपा सरकार केंद्रिय तपास यंत्रणेच्या माध्यमातून सत्तेचा गैरवापर करत आहेत.”