गुलाबी थंडीचे शानदार आगमन झाले असतानाच काल अचानक बोचरी थंडी गायब झाली आणि आज संध्याकाळी अनेक ठिकाणी वळवाच्या पावसासारखे तुषार कोसळले. त्यामुळे बागायतदार चिंताग्रस्त बनले आहेत. दिवाळीपूर्वी थंडीचे आगमन होते, पण गेल्या काही वर्षांत उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या तिन्ही ऋतूंचे दर्शन एकाच हंगामात पाहावे लागत आहे. या बदलत्या पर्यावरणीय हवामानाचा खेळ शेतकरी व बागायतदारांच्या चिंतेचा बनला आहे.
यंदा गुलाबी बोचऱ्या थंडीचे आगमन झाले. त्यानंतर गेला आठवडाभर या थंडीचे आगमन सर्वानाच सुखावह वाटत होते, पण काल अचानक थंडी गायब झाली आणि आज दुपारी वळवाच्या पावसासारखे तुषार अनेक ठिकाणी पडले.या अवेळी कोसळलेल्या पावसाचा आंबा व काजू बागायतींना फटका बसण्याची भीती आहे. उशिराने हंगाम सुरू होत असतानाच बोचऱ्या थंडीने चकवा दिल्याने चिंतेचे वातावरण आहे.
या हंगामात तिन्ही ऋतूंचे आगमन बागायतींना धोका देणारे ठरत आहे. या पर्यावरणीय बदलाच्या अभ्यासाची गरज आहे. आंबा कलमांना पालवी फुटल्याने हंगाम उशिरा येण्याची भीती असतानाच अनेक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाल्याने बागायतदारांत चिंता निर्माण झाली आहे. यंदा आंबा, काजू उशिराने येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा